

राजापूर : राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे घडलेल्या गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात रत्नागिरी पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणी धाराशिव जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेली स्कॉरपिओ गाडी तसेच घरफोडीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईमुळे राजापूर परिसरात निर्माण झालेले भीतीचे वातावरण काही प्रमाणात निवळले आहे.
ही घटना २३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली होती. राजापूर तालुक्यातील मौजे कोळवणखडी, खालची मोरेवाडी येथे राहणारे सदानंद शांताराम मोरे (वय ५५) यांच्या घरात चार अज्ञात इसमांनी अंधाराचा फायदा घेत प्रवेश केला. यातील दोघांनी किचनच्या खिडकीतून तर उर्वरित दोघांनी मुख्य दरवाजातून घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी घरातील पैसे ठेवण्याचा डबा, ज्यामध्ये सुमारे १,००० ते १,२०० रुपये होते, पळवण्याचा प्रयत्न केला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे मोरे कुटुंब भयभीत झाले असून परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते.
या घटनेप्रकरणी सदानंद मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) व ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला गती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व राजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच गोपनीय सूत्रांच्या आधारे आरोपींचा माग काढला. या गुन्ह्यात धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथील सुनील पवार व त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली.
आरोपींच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व राजापूर पोलिसांची संयुक्त पथके धाराशिव व सोलापूर जिल्ह्यात रवाना करण्यात आली. दरम्यान, २१ डिसेंबर २०२५ रोजी आरोपी इंदापूर हायवेवर येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आरोपींना त्यांच्या स्कॉरपिओ गाडीसह ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनील भीमा पवार (वय २७, रा. पारधी वस्ती, मोहा, जि. धाराशिव) व अजय उत्तरेश्वर गवळी (वय २०, रा. पिंपळवाडी, लाखनगाव, जि. धाराशिव) अशी आहेत. प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य दोन आरोपींची नावेही निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर पोलीस करीत आहेत.