जिल्ह्यात अवकाळीच्या सरी

Heavy rain: चार दिवस दररोज पडणार्‍या पावसामुळे फळ पिकांचे नुकसान
Rainfall in Sindhudurg district
कणकवली ः एरव्ही वाहनांच्या वर्दळीने गजबजलेला मुंबई-गोवा महामार्गाचा सर्व्हिस रोड पावसामुळे असा ओस पडला होता. तर दुचाकीस्वारांनी उड्डाण पुलाखाली आसरा घेतला होता.pudhari photo
Published on
Updated on

कणकवली ः कणकवलीसह जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यांत बुधवारी दुपारी व सायंकाळी गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे काही काळ वातावरणात थंडावा निर्माण झाला होता; परंतु पाऊस गेल्यानंतर पुन्हा उष्म्यात वाढ झाली होती. दुपारनंतर ढगाळ वातावरण कायम होते.

जिल्ह्याच्या वैभववाडी ते दोडामार्ग दरम्यानच्या सह्याद्री पट्ट्यात गेले चार दिवस वळवाचा पाऊस पडत आहे. गेले चार दिवस वातावरणही दमट असून ढगाळ वातावरणामुळे सरासरी तापमान वाढले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये मंगळवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर मध्यरात्रीही काही ठिकाणी तुरळक पा ऊस झाला. बुधवारी पहाटेही जिल्हयाच्या अनेक भागात पाऊस झाला तर बुधवारी दुपारी कणकवलीसह ग्रामीण भागात पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्धा तास मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने काही भागात पाणी साचले होते.

गेले चार दिवस दररोज पडणार्‍या या पावसामुळे आंबा, काजू बरोबरच इतर फळ पिकांचेही नुकसान होत आहे. त्याच बरोबर अनेक ठिकाणी घरांची बांधकामे किवा दुरूस्ती काम सुरू असून या पावसाचा फटका या कामांना बसत आहे. शिवाय सिमेंट आदी बांधकाम साहित्य भिजून नुकसान होत आहे. वादळी पावसामुळे वीज सेवा ठप्प होत असून गेले काही दिवस विजेचा सातत्याने लंपडाव सुरू आहे. यामुळेही नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण भागातील दूरसंचारचे मोबाईल टॉवरची सेवाही या अवकाळी पावसामुळे प्रभावीत होत असल्याने मोबाईल ग्राहक, व्यापारी, विद्यार्थी अश्या सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान मुंबई वेधशाळेनेही पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

चाकरमानी व नागरिकांचा हिरमोड...

सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम असल्याने गावोगावी चाकरमानी दाखल झाले आहेत. विवाह सोहळे, मंदिरांमधील धार्मिक कार्यक्रम, घरगुती धार्मिक सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कार्यक्रमांमध्येही अवकाळी पावसाचे विघ्न येत असल्याने चाकरमानी व नागरिकांचा हिरमोड होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news