

सिंधुदुर्गनगरी ः पत्रकाराने पक्षीय असणे गैर नाही,मात्र बातमीदार म्हणून त्याची भूमिका निपक्ष हवी, असे मत पुढारी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसन्न जोशी यांनी व्यक्त केले. वृत्तपत्र क्षेत्रामध्ये आज वेगाने बदल होत आहेत. प्रिंट मिडीयाप्रमाणेच आज लाईव्ह मिडीया, युट्यूब चॅनेल यांचे महत्वही वाढले आहे. किंबहुणा ती आज काळाची गरज बनली आहे. यासाठी वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीनेही हा बदलाना पूरक अपडेट होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकारसंघ आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात ते बोलत होते. आज कोणत्याही वृत्तपत्र कार्यालयात स्वतंत्र प्रुफ रिडर नाही. ते काम आज उपसंपादकालाच करावे लागते.यापुढे जाऊन उपसंपादकानेच पेजीनेशन करणे अपेक्षीत आहे. वृत्तपत्र व्यवसायातील ‘कॉस्ट कटींग’ साठी याबाबी आता आवश्यक बनल्याचे ते म्हणाले. भविष्यात ‘एआय’ मुळे केवळ दोन ते तीन माणसे संपूर्ण आवृतीचे काम पहातील,असे त्यांनी सांगितले.
आज पत्रकारातेत राजकिय आवाहने वाढत असून त्यामुळे पत्रकारीता बदनामी होत असल्याचे ते म्हणाले. देशात कॉग्रेस व भाजपाने एकत्र यावे असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म. गो. वैद्य यांनी एकेकाळी मांडले होते, असे ते सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकारांना पेन्शन याबाबत पत्रकारांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पत्रकारीतेचा मोठा वारसा आहे.मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर जसे सिंधुदुर्गचे सुपूत्र होते तसेच हिंदी पत्रकारीतेचे जनक बाबुराव पराडकर हे सुद्धा सिंधुदुर्गचे सुपूत्र होते.त्याचा सा र्थ अभीमान आपण सर्वांना हवा. यासाठी बाबुरावे पराडकर यांचेही स्मारक सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्हायला हवे, असे सांगत यासाठी जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.