Sindhudurg News : आचर्‍यात ११ केव्ही स्विच बंद करून वीजपुरवठ्यात अडथळा

अज्ञाताचे कृत्य; तीन वाड्या रात्रभर अंधारात
Electricity Supply
Electricity Supply(Pudhari File Photo)
Published on: 
Updated on: 

आचरा : आचरा-देवगड रोडनजीक श्री देव रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गालगत असलेला ११ केव्ही एबीसी स्विच शनिवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक बंद केला. यामुळे देऊळवाडी, पारवाडी आणि नागोचीवाडी परिसरातील नागरिकांना शनिवारी व रविवारी रात्रभर अंधारात राहावे लागले. या प्रकारामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागला.

या घटनेची माहिती वायरमन पिंटू साळकर यांनी रविवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र घाडी, चंदू कदम आणि पत्रकार परेश सावंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधितांच्या लक्षात ही बाब आणून देत वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत करण्यात आला. विशेष म्हणजे, यापूर्वीही आचरा गावातील इतर वाड्यांमध्ये अशाच प्रकारे वीजपुरवठ्यात अडथळा आणण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक वीज यंत्रणेशी जाणीवपूर्वक छेडछाड करणाऱ्या या प्रकारांबाबत ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वीजपुरवठा खंडित करून नागरिकांना वेठीस धरणाऱ्या अशा प्रकारांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक वीज यंत्रणेशी जाणीवपूर्वक छेडछाड करणे हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी खेळण्याचा प्रकार आहे. अशा कृत्यांची गंभीर दखल घेऊन संबंधितांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी आचरे गावातील ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.