­­­Sindhudurg News : सिंधुदुर्गनगरीतील मुख्य रस्त्यावर खड्डे

प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
­­­Sindhudurg News
सिंधुदुर्गनगरीतील मुख्य रस्त्यावर खड्डे
Published on
Updated on

ओरोस : जिल्ह्याची राजधानी असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील प्रमुख रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून अनेक रस्ते खड्यात गेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच डॉन बॉस्को स्कूल व जिल्हाधिकारी कार्यालय जिजामाता मेडिकल कॉलेज रानबांबुळी तिठा या मुख्य मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय समोरील रस्त्यावर पाणी साचून तेथे तळ्याचे स्वरूप निर्माण होत आहे. अपुरी जलनिस्सारण व्यवस्था आणि खड्ड्यांमुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी एक बळी जाऊनही सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार तक्रारी करून प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मुख्यालयाकडे जिल्ह्यातून येणाऱ्या अनेक नागरिकांना आपल्या जीव मुठीत घेऊन यावे लागते. गेल्या सहा महिन्‍यांत याबाबत वारंवार तक्रारी आणि एका महिला कर्मचाऱ्यांचा बळी गेला आहे. अजून किती बळी घेणार असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. जिल्ह्याचे वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग नगरीत असल्यामुळे जिल्हाभरातून अनेक अत्यवस्थ, अपघात ग्रस्‍त रुग्ण या ठिकाणी आणले जातात. त्यांना मुख्यालयातच खड्ड्यातून प्रवास करावा लागतो. या खड्ड्यांकडे अनेकवेळा प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. मंत्री दौऱ्यावेळी केवळ दिखाऊ स्वरूपात ग्रीट टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता १५ ऑगस्ट कालावधीमध्ये रस्त्यावर काँक्रीट डांबर किंवा ग्रिट टाकून दिखाऊ खड्डे बुजविले जातील. परंतु जोरदार पावसात ग्रीट वाहून गेल्याने खड्डे पूर्ववत होतात यात लाखो रुपये वाया गेले आहेत. यामुळे संबंधित यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर पावसाचे पाणी साचून अक्षरशः तळे निर्माण झाले आहे. त्यात करून चिखलाचे साम्राज्य झाले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच ही परिस्थिती असताना आणि रोज अधिकारी व कर्मचारी याच मार्गान ये-जा करत असतानाही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिंधुदुर्गनगरीतील अनेक रस्त्यांवर पावसाचे खड्ड्यांत पाणी साचून राहत असल्याने जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत. रत्यावर वाहनचालकांसाठी अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.

सिंधुदुर्गनगरी नवनगर प्राधिकरणाच्या अध्यक्षा प्राधिकरणाचे सदस्य तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीनी याकडे तातडीने लक्ष देऊन रस्त्यांची कायमस्वरूपी दुरुस्ती, प्रभावी जलनिस्सारण व्यवस्था आणि वाढलेली झाडी हटविण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या या परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि सिंधुदुर्ग नगरीचा खिळ बसलेला विकास तातडीने सुधारला नाही, तर नागरिकांचा रोष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news