Road Condition Issue | सावधान... आपण चंद्रावर प्रवास करत आहात!

उपरोधिक डिजिटल फलकामधून खड्डेमय रस्त्याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त
Road Condition Issue
वेताळबांबर्डे : महामार्गावर लागलेला उपरोधिक बॅनर. (Pudhari File Photo)
Published on: 
Updated on: 

कुडाळ : आपण चंद्रावर प्रवास करत आहात, जरा सांभाळून, रस्ता हरवला आहे, प्रशासन गाढ झोपलयं असा उपरोधिक संदेश लिहिलेले बॅनर्स सध्या कुडाळ तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई - गोवा महामार्गासह तालुक्यातील ठिकठिकाणच्या खड्डेमय रस्त्यांवर हे बॅनर्स लागले आहेत. तालुक्यात महामार्गासह रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर लक्ष वेधून घेणारे हे उपरोधिक बॅनर्स ठिकठिकाणी झळकत आहेत. त्यामुळे आतातरी प्रशासन जागे होणार का? असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गासह तालुक्यातील बहुतांशी रस्त्यांची खड्डे पडून अक्षरशः दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. शहरासह ग्रामीण भागांत रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाकडून खड्डे बुजविण्याचा फार्स करण्यात आला, पण धो धो कोसळलेल्या पावसाने या खड्डे बुजविण्याच्या तकलादू कामाची पोलखोल केली. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात रस्ते पुन्हा खड्डेमय बनले. गणेशमूर्ती आगमनापासून विसर्जनापर्यंत गणेशभक्तांना या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करण्याची वेळ आली. जागोजागी पडलेले मोठे खड्डे वाहनचालकांसाठी आणि प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहेत. हे खड्डे कमी असल्याचा दावा करत, काही नागरिकांनी रस्त्यांची तुलना चक्क चंद्राच्या पृष्ठभागाशी केली आहे. ‘आपण चंद्रावर प्रवास करत आहात, जरा सांभाळून, रस्ता हरवला आहे, प्रशासन गाढ झोपलयं’ असा उपरोधिक संदेश लिहिलेले बॅनर्स तालुक्यात ठिकठिकाणी लावले आहेत.

Road Condition Issue
Kudal Journalist Award | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारिता चिकित्सक!

मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे, हुमरमळा तसेच कुडाळ मालवण मार्गासह अनेक ठिकाणी सुजाण नागरिकांनी हे उपरोधिक संदेश देणारे बॅनर्स लावून निद्रिस्त प्रशासनाला खडबडून जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याशिवाय लोकप्रतिनिधींनाही या समस्येकडे गांभीर्याने पाहण्यासाठी लक्ष वेधण्यात आले आहे. हे बॅनर्स सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. हे बॅनर वाचून वाहनधारक, चाकरमानी, नागरिक प्रशासनाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

Road Condition Issue
Kudal Don Bosco Church Fire | कुडाळातील डॉन बॉस्को चर्च इमारतीला आग!

चार दिवसांपूर्वी कुडाळ शहरातील काळपनाका येथे तसेच पिंगुळी येथे वेंगुर्ले मार्गावर खड्ड्यांत दुचाकी आदळून अपघाताच्या घटना घडल्या. दोन्ही ठिकाणी दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाले. अशा वारंवार घटना खड्डेमय महामार्गासह चालक, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन, रस्त्यांची दुरुस्ती दर्जेदार करावी, अशी अपेक्षा जनता व्यक्त करत आहे. आता या बॅनरमुळे तरी प्रशासनाला जाग येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.