कुडाळ : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरात गुरुवारी सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या उपस्थितीत पोलिस प्रशासनाकडून संचलन करण्यात आले. यात कुडाळ पोलिसांसह विशेष पोलिस पथक, सशस्त्र पोलिस दल सहभागी झाले होते.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिस प्रशासन अलर्ट झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, शांतता, सुव्यवस्था राहावी यादृष्टीने जिल्हा पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याच अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी कुडाळ शहरात पोलिस प्रशासनाच्या वतीने संचलन करण्यात आले.
यात जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहाय्यक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच सशस्त्र पोलिस दल सहभागी झाले होते.
पोलिस स्टेशन येथून या रूट मार्चला सुरूवात करण्यात आली. जिजामाता चौक, गांधीचौक, बाजारपेठ मार्गे परत पोलिस स्टेशन असा हा रूट मार्च काढण्यात आला.