

सावंतवाडी : खुनाच्या आरोपात तब्बल सहा महिने जेलमध्ये राहिलेल्या लोकांनी मला शिकवू नये. मी शांत आहे,याचा अर्थ वेगळा काढू नये. मला कोणाशी राजकीय संघर्ष करायचा नाही, तसा प्रयत्न झाल्यास मला पुन्हा एकदा उग्र भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी थेट भाजपा नेते राजन तेली यांना दिला आहे.
माझ्यावर टीका करणाऱ्यांची अनेक कृष्णकृत्य मला माहिती आहेत. त्यावर मला बोलायला लावू नये, तसा प्रयत्न पुन्हा झाल्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. मात्र काही झाले तरी आता बदनामी सहन करणार नाही,असा इशाराही त्यांनी दिला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत शिरशिंगे धरण प्रकल्पाचा तिढा सुटला आहे. आता या धरणाचे काम सुरू होणार आहे.
त्यासाठी साडेसहाशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. यामुळे पंचक्रोशीतील गावे ओलिताखाली येणार आहेत तसेच माडखोल, माजगाव अशा अन्य १० लघु धरणांची कामे मार्गी लावली आहेत. शिरशिंगे धरणासाठी साडे सहाशे कोटी रुपये मंजूर झाले असून लवकरच हे काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न नक्कीच सुटेल, असे त्यांनी सांगितले.
सावंतवाडीत साई मंदिर उभारणार सावंतवाडी, विधानसभा मतदारसंघातील लोकांना साईबाबांचे दर्शन घेता यावे यासाठी लवकरच सावंतवाडी शहरात प्रतिशिर्डी साई मंदिर उभारण्यात येणार, असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.