

कणकवली : मालवण तालुक्यातील पेंडूर येथून कणकवली येथे कारने येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर वागदे-डंगळवाडी येथे कारवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (32, रा.पेंडूर) हा युवक जागीच ठार झाला. तर सोबत असलेला उदय बाबाजी पवार (32, रा.पेंडूर) हा जखमी असून, त्याच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी सायंकाळी 6.15 वा.च्या सुमारास घडला.
पेंडूर येथील मयुरेश पेंडुरकर हा पुणे येथे नोकरीला होता. काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. सोमवार, 5 मे रोजी तो पुन्हा पुणे येथे जाणार होता. तर त्याच्या सोबत असलेला उदय पवार हा मूळचा कणकवली तालुक्यातील नरडवे गावचा असून, तो पेंडूर येथे मामाजवळ राहत होता. मयुरेश हा त्याचा मामेभाऊ होता.
दोघेही पेंडूर येथून कामानिमित्त कारने कणकवलीला येत होते. मात्र, वागदे येथे त्यांच्या कारला झालेल्या अपघातात मयुरेशचा मृत्यू झाला. तर उदय पवार याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. अपघातानंतर घाबरलेला उदय बोलण्याच्या स्थितीत नसल्याने नेमका अपघात कसा झाला, याची माहिती मिळू शकली नाही.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कणकवलीतील सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव, नवराज झेमणे, सागर मूळे, दीपक पवार, अविनाश पाटील, प्रद्युम्न मुंज, अमित भोसले, दर्पण वणवे आदींसह नातेवाईक व मित्रमंडळींनी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली.
तसेच कणकवलीचे सहा.पोलिस निरीक्षक डॉ. ज्ञानेश सावंत, वाहतूक पोलिस आर. के. पाटील, भूषण सुतार, शंकर पार्सेकर आदी पोलिस उपजिल्हा रूग्णालयात पोहोचले होते. अपघातानंतर मयुरेशचा मृत्यू झाल्याने मित्र परिवारामधून हळहळ व्यक्त केली जात होती.