

कुडाळ : कुडाळ - बांव रस्त्यावर कुडाळ कविलकाटे-जमादारवाडी येथे टेम्पोने पादचारी लालसाब दौलसाब खाणापूर (49, रा. कविलकाटे-जमादारवाडी) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर टेम्पो रस्त्यालगत विद्युत खांबासह संरक्षक भिंतीला जाऊन धडकला. यात श्री. खाणापूर हे टेम्पोखाली चिरडल्याने ते जागीच ठार झाले.
हा अपघात शनिवारी रात्री 9.45 वा. सुमारास झाला. टेम्पोच्या धडकेत वीज खांब वाकल्याने विद्युत वाहिन्या तुटून खाली पडल्या. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. परिसरातील वीज पुरवठाही खंडीत झाला. अपघातानंतर पळून गेलेल्या टेम्पो चालकाला कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेत, त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
या अपघाताची खबर मोहम्मदसुफीयान दस्तगीर पटेल सासाबाल (21, रा.मस्जिद मोहल्ला, रेल्वे स्टेशन रोड कुडाळ) यांनी कुडाळ पोलिसात दिली असून, त्यानुसार टेम्पोचालक पांडुरंग शिवाजी खोत (40, मूळ रा.बेळगाव-) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मजूर म्हणून काम करणारे लालसाब दौलसाब खाणापूर हे गेली अनेक वर्ष जमादारवाडी येथे राहतात.
मजुरीचे काम आटोपून शनिवारी रात्री ते रस्त्याच्या कडेने पायी कविलकाटे-जमादारवाडी येथील आपल्या घरी जात होते. दरम्यान पांडुरंग खोत हा टेम्पो घेऊन कुडाळ ते बांव जात होता. कविलकाटे-जमादारवाडी तिठा येथील वळणावर त्याच्या टेम्पोंची धडक पादचारी श्री. खाणापूर यांना बसली. या धडकेने श्री. खाणापूरहे रस्त्यावर पुढे फेकले गेले, तर टेम्पोही त्याच वेगात पुढे जात श्री. खाणापूर यांना चिरडून पुढे रस्त्यालगतच्या विद्युत खांबासह संरक्षक भिंतीवर आदळला.
यात श्री.खाणापूर यांचा जागीच मृत्यू झाला. टेम्पोच्या धडकेत वीज खांब वाकून विद्युत भारीत वाहिन्यांसह खाली कोसळला. तर चिरेबंदी संरक्षक भिंतही कोसळली. वीज वाहिन्या तुटून पडल्याने परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला. मात्र जोराचा आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, अपघात झाल्याचे निदर्शनास आले. अंधार असल्याने मदतकार्यात अडचणी निर्माण झाल्या.
अन्य वाहनांच्या प्रकाशाने टेम्पोखाली अडकलेल्या खाणापूर यांना नागरिकांनी बाहेर काढून, रुग्णवाहिकनेने कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. श्री.खाणापूर यांचे निधन झाल्याचे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
दिवसभर मजुरीचे काम करून घरी परतणार्या श्री.खाणापूर यांचा घरापासून काही अंतरावरच दुर्देवी अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या हातात दुपारच्या जेवणाच्या डब्याची पिवशी होती. घटनास्थळावरचे दृश्य पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. अपघातानंतर टेम्पो चालकाने तेथून पलायन केले, त्यामुळे नागरिक संतप्त झाले. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
तसेच टेम्पो चालकाचा शोध घेतला असता तो परिसरात पोलिसांना सापडून आला. दरम्यान टेम्पो चालक पांडुरंग खोत याने दारू प्रायन केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी टेम्पोचालक पांडुरंग खोत याच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.
पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सहा.निरीक्षक जयदीप पाटील, उपनिरीक्षक अनिरुद्ध सावर्डे, कॉन्स्टेबल महेश भोई, सचिन गवस, श्री.तिवरेकर यांनी पंचनामा केला. नगरसेविका आफरीन करोल, माजी नगरसेवक एजाज नाईक यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी तसेच रूग्णालयात धाव घेतली होती. मोबाईल फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.
टेम्पोची अन्य दोन वाहनांनाही धडक
सदरील टेम्पोत केबल साहित्य होते. हा टेम्पो भरधाव वेगात जात असताना, शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात याच टेम्पोने एका वाहनाला धडक देत पुढे पलायन केले. पुढे काही अंतरावर ऊर्दू शाळे नजीक एका दुचाकीला या टेम्पोने धडक दिली. मात्र, तेथे टेम्पोचालक न थांबता वेगात टेम्पो घेऊन पलायन करीत असताना हा तिसरा अपघात घडल्याची चर्चा घटनास्थळी नागरिकांमध्ये सुरू होती. मात्र, अन्य दोन अपघातांबाबत पोलिसांत नोंद नव्हती.