Sindhudurg News| ‘गुलदार’ युद्धनौका पाहण्यासाठी प्रवासी पाणबुडीची निर्मिती

निवती येथे समुद्रातील प्रकल्प : १६० कोटी खर्च होणार
Sindhudurg News
‘गुलदार’ युद्धनौका पाहण्यासाठी प्रवासी पाणबुडीची निर्मिती
Published on: 
Updated on: 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारा महत्त्वाकांक्षी अंडरवॉटर टुरिझम प्रकल्प आता प्रत्यक्षात आकार घेत आहे. निवती रॉकजवळ भारतीय नौदलाची निवृत्त युद्धनौका ‘एक्स-आयएनएस गुलदार’ १९ मे २०२६ रोजी समुद्रात सुमारे २२ मीटर खोलीवर बुडवण्यात आली. या जहाजाचे रूपांतर भारतातील पहिले समुद्राखालील संग्रहालय (अंडरवॉटर म्युझियम) आणि कृत्रिम प्रवाळ खडक (आर्टिफिशियल रीफ) म्हणून करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १६० कोटी रु. निधी मिळणार असून, प्रवासी पाणबुडीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या प्रकल्पामुळे समुद्राखालील पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच सागरी जैवविविधतेच्या संवर्धनालाही मदत होणार आहे. बुडवण्यात आलेल्या जहाजाभोवती कालांतराने प्रवाळांची वाढ होऊन विविध प्रकारच्या माशांना आणि सागरी जीवांना अधिवास उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून ४६.९१ कोटी रुपये, तर राज्य सरकारकडून ११२.४६ कोटी रुपये असे एकूण १५९.३७ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

दरम्यान, पर्यटकांना समुद्रात उतरून स्कुबा डायव्हिंग न करता पाण्याखालील जहाजाचे दर्शन घेता यावे, यासाठी २४ आसनी बॅटरीवर चालणारी प्रवासी पाणबुडी तयार करण्यात येत आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स (एमडीएल) यांच्याकडे या पाणबुडीच्या निर्मितीची जबाबदारी असून, त्यासाठी ११०.५८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे यांच्या माहितीनुसार, पाणबुडी निर्मितीचे काम सध्या सुरू असून, पुढील दीड वर्षात म्हणजेच २०२७ अखेरपर्यंत ही सुविधा पर्यटकांसाठी सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाच्या महत्त्वाची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात या प्रकल्पाला ‘द वीक हेरिटेज अवॉर्ड - गोल्डन बॅनियन अवॉर्ड २०२६’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.