Sindhudurg Crime : पणदूर तिठ्यावर ‘अंबरग्रीस’ तस्करीचा पर्दाफाश; सिंधुदुर्ग एलसीबीची मोठी कारवाई!

व्हेल माशाच्या उलटीसह कार व दुचाकी जप्त
Sindhudurg Crime News
पणदूर तिठ्यावर ‘अंबरग्रीस’ तस्करीचा पर्दाफाश
Published on
Updated on

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पणदूर तिठा परिसरात शनिवारी (दि.२९) सायंकाळी उशिरा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने (एलसीबी) धडक कारवाई करत अंबरग्रीसच्या (व्हेल माशाची उलटी) कथित तस्करीचा पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत तीन ते चार संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यांमध्ये कुडाळ आणि मालवण तालुक्यातील संशयितांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पणदूर तिठा परिसरात सापळा रचला. संशयित ठिकाणी दाखल होताच पोलिसांनी अचानक धाड टाकून त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईत कथित तस्करीसाठी वापरलेली एक कार आणि एक दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.

कारवाईनंतर जप्त केलेला मुद्देमाल व संशयितांना घेऊन एलसीबीचे पथक पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास बडवे आणि एलसीबी पथकाने या कारवाईला दुजोरा दिला आहे. एलसीबीच्या या अचानक आणि मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यातील तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले असून पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news