

कुडाळ : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. वेताळबांबर्डेत खड्ड्यांत मोटरसायकल आदळून मागे बसलेल्या महिलेचे निधन झाल्याची घटना घडल्यानंतर काही तासांतच पणदूर जवळील खड्ड्यांत दुचाकी आदळून एका युवकाला गंभीर दुखापत झाली. दुचाकीसह सदर युवक रक्ताच्या थारोळ्यात भररात्री रस्त्यावर पडला होता. दरम्यान पेट्रोलिंग करणार्या महामार्ग पोलिसांनी मदतकार्य करीत, त्या जखमी युवकाला उपचारासाठी सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले. ही घटना शनिवारी मध्यरात्री 1.30 वा.च्या सुमारास घडली. बराच वेळ दुचाकीस्वार युवक जखमी अवस्थेत विव्हळत रस्त्यावर पडला होता, सुदैवाने महामार्ग पोलिस दाखल झाल्याने त्याचे प्राण वाचले.
दर्शन प्रभाकर राणे (रा. वरेरी -राणेवाडी, ता. देवगड)अङसे या गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. महामार्गावरील खड्डे वाचवताना खडीत दुचाकी स्लीप होऊन रस्त्यावर पडली. यात त्याला गंभीर दुखापत होऊन तो बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात महामार्गावर पडला होता. रात्रीची वेळ असल्याने मदतीलाही कुएी नव्हते. सुदैवाने त्याच वेळेस महामार्गावर पेट्रोलिंग करणारी महामार्ग पोलिसांची व्हॅन दाखल झाली आणि त्या जखमी युवकाला मदत मिळाली. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सहा.पोलिस निरीक्षक प्रकाश गवस, चालक श्री.गोसावी, पोलिस कॉन्स्टेबल नितीन शेटये व रवी इंगळे यांनी हे मदतकार्य केले. पोलिसांच्या रूपाने त्या जखमी युवकाला वेळीच मदत मिळाल्याने ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ असेच म्हणावे लागेल.
महामार्गाची खड्डे पडून दयनीय अवस्था झाली आहे. खड्डे चुकवताना वाहनधारकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. तरीही महामार्ग प्रशासनाकडून दर्जेदार दुरूस्तीची कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. रात्रीच्या वेळेस तर मोटरसायकलने प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. वारंवार घडणार्या अपघाताच्या घटना लक्षात घेता स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे गांभीर्याने कधी लक्ष देणार? असा सवाल वाहनधारक आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.