

कणकवली : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे येथून मोठ्या संख्येने चाकरमानी सिंधुदुर्गात येणार आहेत. या चार दिवसांत १४०० एसटी बसेस सिंधुदुर्गात मुंबई, ठाणे, पालघर आदी भागातून येणार आहेत. या चाकरमान्यांसाठी सिंधुदुर्ग विभागातून १२० बसेस महामंडळाने मागविल्या आहेत. त्यापैकी ५० बसेस गुरुवारी मुंबईत जाणार आहेत, तर ७० बसेस शुक्रवारी ठाणे येथे पाठविल्या जाणार आहेत. त्याचा परिणाम सिंधुगातील स्थानिक वेळापत्रकावर झाला असून पुढील काही दिवसांत सिंधुदुर्ग विभागातील १५० हून अधिक स्थानिक फेऱ्या रद्द झाल्या आहेत.
एसटी महामंडाळाच्या या अनाकलनीय कारभारचा आर्थिक व मानसिक फटका स्थानिक ग्रामीण प्रवाशांना तसेच गावी आलेल्या चाकरमान्यांना सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठांमधून येत आहेत; मात्र घरी परतण्यासाठी नियमित एसटी फेऱ्या नसल्याने नागरिकांना रिक्षा किंवा अन्य खासगी वाहतुकीसाठी दामदुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.
जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात एसटी मुंबईला पाठवल्याने संपूर्ण जिल्ह्यातील एसटीचे वेळापत्रक कोलमडले आहे. गणेशोत्सव कालावधीत सिंधुदुर्गात प्रवासी संख्या कमालीची वाढते. या काळात ग्रामीण मार्गांवर जादा फेऱ्यांची आवश्यकता असताना असलेल्या नियमित फेऱ्या रद्द करण्याची वेळ एसटी महामंडळावर आली आहे.
या कालावधीत राज्यभरातील इतर विभागातील एसटी बसेस चाकरमान्यांसाठी घेतल्या असताना सिंधुदुर्गातील एवढ्या बसेस कशासाठी मागवल्या, हा प्रश्न आहे. विशेष म्हणजे, या फेऱ्या सिंधुदुर्ग ते मुंबई पूर्णपणे रिकाम्या जात आहेत. या बसेस केवळ परतीच्या प्रवासात त्या चाकरमान्यांना घेऊन येणार आहेत. सिंधुदुर्गात सध्या गणेशोत्सवाची लगबग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक फेऱ्या रद्द झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांची कुचंबणा व परवड होत असून एसटीच्या कारभाराबाबत प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
घर गाठण्यासाठी मोजावे लागताहेत हजारो रुपये!
मुंबई, पुणे येथून रेल्वे, एसटी व खासगी आराम गाड्यांद्वारे चाकरमानी गावी येण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग असा रेल्वे अथवा एसटी प्रवास ३०० ते ६०० रुपयांत केल्यानंतर या चाकरमान्यांना अवघे काही किलोमीटरवरील घर गाठण्यासाठी खासगी वाहनांना हजारो रुपये मोजावे लागत आहेत.