ओसरगाव महामार्गानजीक महिलेचा जळालेला मृतदेह

Woman's Burnt Body: खून करून जाळल्याची शक्यता ः गुडघ्यापासून एकच पाय शिल्लक
Sindhudurg  Crime News |
ओसरगाव महामार्गानजीक महिलेचा जळालेला मृतदेह File Photo
Published on
Updated on

कणकवली ः मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव-कुलकर्णीनगरनजीक माळरानावर एका 35 ते 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सोमवारी मध्यरात्री 12.15 वा. च्या सुमारास जळालेल्या स्थितीत आढळून आला. हा मृतदेह पूर्णपणे जळालेला असून, केवळ उजव्या पायाचा गुडघ्यापासूनचा काही भाग शिल्लक राहिला आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर मध्यरात्रीपासून ते मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी तो परिसर पिंजून काढला. मात्र त्यानंतरही त्या मृतदेहाची ओळख पटणारा तसेच अन्य कोणताही सुराग आढळून आलेला नाही. दिवसभराच्या तपासाअंती प्रथमदर्शनी खून करून महिलेचा मृतदेह जाळला असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान जाळण्यात आलेली ती महिला सिंधुदुर्गातील आहे की परजिल्हयातील आहे? मृतदेह बाहेरून आणून जाळला की त्याच ठिकाणी खून करून जाळला? हा मृतदेह नक्की कोणाचा? या सर्व बाबींचे गुढ अद्यापही कायम आहे.

सोमवारी मध्यरात्री मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे 100 मीटर अंतरावर ओसरगाव येथील कुलकर्णीनगर नजीक आग पेटताना तेथील सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांना दिसून आली. त्यांनी जावून पाहिले असता एक मृतदेह जळताना दिसून आला. त्यांनी याबाबत तात्काळ कणकवली पोलिसांना माहिती देताच कणकवलीचे पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्यासह अधिकारी, कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस पथकही घटनास्थळी दाखल झाले मात्र तोपर्यंत मृतदेह पूर्णपणे जळालेला होता. केवळ उजव्या पायाचा काही भाग शिल्लक होता. त्या पायात पैजण आहे. त्याचबरोबर जळालेल्या मृतदेहाची पाहणी केली असता एका कानात कुडे, दोन्ही हातात काचेच्या पाच ते सात बांगड्या असल्याचे दिसून आले आहे.

मृतदेह पेट्रोल किंवा डिझेलने जाळल्याची शक्यता

ज्या ठिकाणी मृतदेह जाळला त्याठिकाणी तिन्ही बाजूने दगड आहेत. तो मृतदेह पेट्रोल किंवा डिझेल ओतून जाळला असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास घटना उघडकीस आली, याचा अर्थ किमान दोन तास आधी तो मृतदेह जाळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने त्याची ओळख पटलेली नाही मात्र प्रथमदर्शनी खून करून त्या महिलेला जाळल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांची घटनास्थळी भेट

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासहित अन्य पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर मंगळवारी सकाळभ् जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनीही घटनास्थळी भेट देवून तपासाबाबत माहिती घेत सूचना केल्या. दिवसभर कणकवली पोलिस, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळापासूनचा जवळपास दोन ते तीन किमीचा परिसर पिंजून काढला. त्या महिलेची ओळख पटवणारा कोणता सुराग किंवा घातपातासाठी वापरलेले काही शस्त्र किंवा अन्य वस्तू मिळते का? याचा शोध घेतला. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही.

फॉरेन्सिक टिमने घेतले मृतदेहाचे नमुने

पूर्णपणे जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कोल्हापूर येथून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले होते. टिमने मृतदेहाचे नमुने घेतले, सायंकाळी पोलिसांनी तो शिल्लक पाय दफन केला. त्या महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून विविध माध्यमातून सुरू आहे. दिवसभर तो परिसर पोलिसांनी सिल करत तपास केला. त्या महिलेच्या पायावर असलेला पैजण विजापूरी महिला वापरतात तसा आहे. त्यामुळे ती परप्रांतीय महिला आहे का? असाही सवाल व्यक्त होत आहे. दरम्यान, ती महिला नेमकी कोण? तिचा घातपात झाला की आत्महत्या? या महिलेचा घातपात करत तिला ओसरगाव मध्ये टाकले की कसे? तसेच या महिलेचा मृतदेह जाळण्यामागची नेमकी कारणे काय? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. त्यादृष्टीने पोलिस सखोल तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news