

ओरोस ः पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जिल्ह्यात 25 हजार 216 लाभार्थीना ऑनलाईन क्रेडिट कार्ड प्रकरणे निश्चित केली असून, अजूनही 15 हजाराहून अधिक लाभार्थी या ऑनलाइन किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या प्रतीक्षेत आहेत तर अजूनही काही लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचली नसल्याचे स्पष्ट होत आहे.
केंद्र आणि राज्य शासनाने पीएम किसान क्रेडिट कार्ड योजना अंतर्गत कृषीच्या सर्व योजनेचा लाभ एका छताखाली देण्यासाठी ही योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात 35 हजार 530 लाभार्थी असून प्रत्यक्षात किसान क्रेडिट कार्डधारक 23 हजार 563 लाभार्थी आहेत. आतापर्यंत 24 हजार 216 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. प्रत्यक्ष महा ई सेवा केंद्र किंवा ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सबमिट केला परंतु तलाठी स्तरावर अजूनही या बर्याच प्रकरणांची छाननी पूर्तता करून फेर अर्ज संबंधित महा-ई-सेवा केंद्रांकडे पाठविण्यास विलंब होत असल्यामुळे 24,216 पैकी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना अजूनही पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळालेला नाही.
अनेक प्रकरणे तलाठी स्तरावरच धुळखात पडली असल्याचे शेतकर्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सुमारे 24 हजार 216 प्रकरणे जिल्हाभरात तयार झाली असून पीएम किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या या लाभार्थ्यांना तलाठ्यांच्या निश्चितीनंतर पीएम किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध होणार आहे आणि त्याच धर्तीवर शेतकरी पीक विमा किंवा प्रधानमंत्री किसान नमो शेतकरी यासारख्या अनेक योजनांचा लाभ मिळणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या माध्यमातून संबंधित तलाठी आणि महसूल अधिकार्यांना जास्तीत जास्त शेतकर्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेतून कार्ड उपलब्ध करून द्यावीत अशा सूचना दिल्या आहेत; परंतु काही ठिकाणी अजूनही तलाठी स्तरावर प्रकरणे धुळखात पडली असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.