

सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोडामार्ग व बांदा परिसरात धुमाकूळ घालणार्या ‘ओंकार’ हत्तीला ‘वनतारा’मध्ये पाठविण्याचे आदेश कोल्हापूर सर्किट बेंचने दिला आहे. शासन या आदेशाचे पालन करेल. त्यासाठी मी आणि आ. दीपक केसरकर ‘वनतारा’च्या संपर्कात आहोत. त्यांची टीम दोनवेळा इथे येऊन गेली आहे. आता लवकरच ‘वनतारा’ची टीम ‘ओंकार’ला पकडण्यासाठी तिसर्यांदा जिल्ह्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणेंनी दिली.
मंत्री राणे शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त सावंतवाडीत आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ. दीपक केसरकर, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, ‘ओंकार’ हत्तीमुळे गेल्या काही महिन्यात शेतकरी व बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. या हत्तीला जेरबंद करण्यासाठी शेतकरी, ग्रामस्थ व बागायतदारांकडून सातत्याने मागणी होत होती. या प्रश्नी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये एक जनहित याचिकाही दाखल झाली होती. या याचिकेच्या सुनावणीनंतर सर्किट बेंचने ‘ओंकार’ हत्तीला पकडून ‘वनतारा’मध्ये नेण्याचे आदेश दिले आहेत. या हत्तीला काही प्राणी प्रेमी संस्था व व्यक्तींकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. मात्र शासनासाठी शेतकर्यांची शेती, बागायती तसेच नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. शिवाय हा निर्णय न्यायालयाचा असल्याने त्याचे पालन करणे शासनाला बंधन कारक आहे.
बिहार निकालाबाबत बोलताना ना. राणे म्हणाले, लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा. राहूल गांधी हे खरेतर देशासाठी पर्यटक आहेत. म्हणूनच असा ‘पार्ट टाईम पॉलिटिशीयन’ बिहारच्या जनतेने नाकारला आहे.