

बांदा : तांबोशे गावात गेले तीन दिवस ‘ओंकार’ हत्ती ठाण मांडून बसल्याने ग्रामस्थांचे हाल झाले आहेत. या काळात हत्तीने भातशेती, सुपारी, केळी, नारळ यासारख्या बागायती पिकांचे प्रचंड नुकसान केले आहे. शेतकरी कष्टाने उभे केलेले पीक हत्तीने धुमाकूळ घालत उद्ध्वस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक शेतकर्यांनी वन विभागाला तातडीने या घटनेची दखल घेऊन हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. आता आमचा अंत पाहू नये, अशा शब्दांत ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली. तांबोशे सरपंच सुबोध महाले यांनी देखील हत्तीच्या दहशतीमुळे शेतकर्यांचे जगणे कठीण झाले असल्याचे सांगत लवकरच उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली आहे.
दरम्यान, ओंकार हत्तीचा गोवा राज्यातील वावर हा गेल्या सहा-सात दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गोव्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी शनिवारी कर्नाटकाचे वनमंत्री यांची भेट घेऊन याप्रकरणी सविस्तर चर्चा केली. या चर्चेत पुढील 14 दिवसांच्या आत ओंकार हत्तीला पकडून सुरक्षितरित्या कर्नाटक येथील हत्ती कॅम्पमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
हत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून तातडीची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. गावकर्यांच्या म्हणण्यानुसार, कबाड कष्ट करून उभी केलेली शेती हा हत्ती उद्ध्वस्त करीत आहे. आमच्या तोंडचा घास तोडून नेणार्या या संकटाचा बंदोबस्त झाला नाही, तर आम्हाला जगणेच कठीण होईल, अशा भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.