

कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप विरोधात शहर विकास आघाडी करूनच निवडणूक लढवण्याचे ठाकरे शिवसेना व मित्र पक्षांनी जवळपास निश्चित केले आहे. या शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हेच असणार आहेत. सर्व प्रभागातील उमेदवार एकमताने निश्चित झाल्यानंतरच या आघाडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. हे उमेदवार निश्चित करण्याबाबत दोन पदाधिकार्यांवर जबाबदारी देण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. येत्या दोन दिवसांत शहर विकास आघाडीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली असून, इच्छुकांच्या मुलाखती बुधवारी सिंधुदुर्गनगरी येथे भाजप कार्यालयात घेण्यात आल्या.
दरम्यान, काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा दिल्याने काँग्रेस यामध्ये सहभागी होणार की नाही? हा प्रश्न असून काँग्रेस पदाधिकार्यांशी याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले. कणकवली नगरपंचायत निवडणुकीची घोषणा होऊन अनेक दिवस झाले तरी महायुती आणि महाविकास आघाडी यांचे चित्र स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भाजप विरोधात महाविकास आघाडी नव्हे तर शहर विकास आघाडी करण्यात बाबत हालचाली सुरू आहेत. मंगळवारी याबाबत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी ठाकरे शिवसेना व महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक झाली.
या बैठकीत शहर विकास आघाडी स्थापन करुनच भाजप विरोधात लढण्याचा निर्णय झाल्याचे समजते. दरम्यान या आघाडी बाबत अतिशय सावधगिरीने पावले टाकली जात आहेत. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार शहर विकास आघाडी करुनच निवडणूक लढवण्याचे निश्चित झाले असून प्रथम सतराही प्रभागातील उमेदवार एकमताने निश्चित करण्यात यावेत असे ठरले आहे. त्याची जबाबदारी दोघां प्रमुख पदाधिकार्यांवर देण्यात आली असून त्यातील जवळपास निम्मेहून अधिक उमेदवार निश्चित झाल्याचे समजते. मागील निवडणूकीत ज्या चुका झाल्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.
त्यामुळे महाविकास आघाडीचे नव्हे तर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर हेच असणार हे देखील स्पष्ट झाले आहे. दरम्यान काँगे्रसने स्वबळावर निवडणूकीचा नारा दिल्याने काँग्रेसची नेमकी भुमिका काय हे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसच्या पक्ष निरिक्षकांनी आघाडीबाबत सन्मानजनक तोडगा निघाला तर ठिक अन्यथा स्वबळावर अशी भुमिका घेतली आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीसाठी काँगे्रस हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. तरी देखील अंतिम चित्र हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होणार आहे. सध्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि कागदपत्रांची तयारी सुरु करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत शहर विकास आघाडी बाबत व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारी बाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.