

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात तब्बल तीन महिन्यांनंतर पुन्हा एंट्री घेतलेल्या ओंकार हत्तीने कळणे येथे बुधवारी रात्री एका बैलाचा बळी घेतला. त्याला अक्षरशः चिरडून ठार मारले. यात शेतकरी शाहीर इस्माईल खान यांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने तेथे असलेल्या इतर दोन जनावरांना वाचवण्यात यश आले. गेल्या आठ महिन्यांत ओंकार हत्तीने तिसरा बळी घेतला असून त्याला वन विभागाने त्वरित पकडावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली.
एप्रिल महिन्यात मोर्ले येथील एका शेतकर्याचा ओंकार हत्तीने बळी घेतला होता. त्यानंतर तिलारी खोर्यात व तळकट पंचक्रोशीत उपद्रव माजवत तो कळपातून विभक्त झाला अन् गोवा राज्यात व सावंतवाडी तालुक्यात पोहोचला. तेथेही त्याने उपद्रव माजविला. पंधरा दिवसांपूर्वी ‘ओंकार’ने बांदा-वाफोली गावातील एका म्हशीवर हल्ला चढवत तिला ठार केले.
बैलाचा तडफडून मृत्यू
दरम्यान ‘ओंकार’ पुन्हा गोवा राज्यात गेला. तेथून बुधवारी सायंकाळी त्याची पुन्हा दोडामार्ग तालुक्यात एन्ट्री झाली. डोंगरपाल मार्गे तो थेट कळणे गावात शिरला. काहीतरी विपरित घडण्या अगोदरच ओंकार हत्तीला पिटाळून लावण्याची मागणी हत्ती बाधित गावातील शेतकरी व ग्रामस्थ करू लागले. मात्र तोपर्यंत ओंकारने डाव साधला.
अंधार होताच ओंकारने थेट कळणे मायनिंगमार्गे डबीवाडी येथील शाहीर इस्माईल खान या शेतकर्याच्या शेतीत शिरकाव केला. वस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या त्यांच्या शेत, बागायतीत त्यांनी आपली पाळीव गुरे दावणीला बांधली होती. त्याठिकाणी शेतातच त्यांचे जुने घर आहे. दिवसा शेत, बागायतीत काम करून रात्री ते नव्याने बांधलेल्या घरात राहण्यासाठी जातात. शेतात शिरलेल्या ‘ओंकार’ने तेथे बांधलेल्या गुरांवर हल्ला चढविला. दरम्यान वनविभागाचे कर्मचारी त्याच्या मागावर होते.
दावणीला बांधलेल्या गुरांवर हत्ती हल्ला करत असल्याचे निदर्शनास पडताच कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखत दोन गुरांची दावण सोडली व ओंकारच्या तावडीतून त्यांना वाचविले. परंतु, एका बैलाची दावण सोडण्याचा अवधी देखील हत्तीने दिला नाही. आक्रमकतेने त्याने या बैलाला पायदळी तुडविले. या हल्यात बैलाने तडफडून जागीच प्राण सोडले. त्यानंतर हत्तीने बागायतींची नासधूस केली. शेतीचे नुकसान सत्र चालू केले. ओंकारचा रात्रभर शेतात वावर होता. या घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन रीतसर पंचनामा केला.
ओंकारची शिरवलकडे कूच
बुधवारी सायंकाळी कळणे गावात दाखल ओंकारने रात्रभर कळणेत दहशत माजवली. रात्रभर कळणे गावात उच्छाद मांडून ओंकार शेती, बागायती पायदळी तुडवत भिकेकोनाळच्या दिशेने गेला. तेथे काहीवेळ स्थिरावून तो गुरुवारी दुपारी कुंब्रल व त्यानंतर शिरवल गावात दाखल झाला.
ओंकारप्रेमी आता कुठे आहेत?
ओंकारला पकडू नये यासाठी आंदोलन, उपोषण करणारे आता मात्र दिसेनासे झाले आहेत. नुकसान भरपाईबाबत पाठपुरावा करणे तर सोडाच, निदान या शेतकर्यांना भेटून सांत्वन करण्याचे औदार्य तरी त्यांनी दाखवायला हवे होते. मानवी जीवनापुढे प्राणी प्रेम एवढे महत्वाचे झाले आहे का? त्यांच्या या कुचकामी आणि बेगडी प्राणी प्रेमामुळे शेतकर्यांचे प्रचंड झालेले नुकसान भरून काढता येणार नाही. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यांच्या जीवित आणि संपत्तीच्या सुरक्षेला प्राधान्य दिलेच पाहिजे, असे मत शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष विलास सावंत यांनी व्यक्त केले.
अजून किती बळींची वाट पाहणार?
ओंंकार हत्ती आक्रमक बनत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकर्यांमधून उमटत आहे. एप्रिल महिन्यात त्याने मोर्ले येथील एका शेतकर्याचा जीव घेतला. त्यानंतर वाफोली येथे एका म्हशीला जागीच ठार केले. बुधवारी रात्री कळणे येथे एका बैलाचा बळी घेतला. त्यामुळे ओंकारने सध्या एका मनुष्याचा तर दोन पाळीव जानवरांचा बळी घेतला आहे. परिणामी तो अधिकच आक्रमक बनत असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे.