Sindhudurg Burglary : नांदगाव घरफोडीतील अट्टल चोरटा गजाआड

एलसीबीच्या पथकाने ठाणे-विरार येथून घेतले ताब्‍यात
Sindhudurg Burglary
नांदगाव घरफोडीतील अट्टल चोरटा गजाआड
Published on
Updated on

कणकवली : नांदगाव-ओटव फाटा येथील काही काळासाठी बंद असलेली दोन घरे फोडून तब्‍बल ५३ हजार १०० रुपयांचा मुद्‍देमाल चोरणारा राजू तुकाराम सुतार (३५, मूळ रा. नाधवडे, ता. वैभववाडी), आधार कार्डवरील पत्ता (कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, काळंबा व सध्या रा. विरार ) याला स्‍थानिक गुन्‍हा अन्‍वेषण शाखेच्‍या एलसीबी पथकाने विरार येथून बुधवारी अटक केली. विशेष म्‍हणजे घरफोड्यांतील काही मुद्देमालही पथकाने हस्‍तगत केला. चोरट्याला कणकवली पोलिसांकडे सुपूर्द करण्‍यात आल्यानंतर त्‍याला गुरुवारी कणकवली पोलिसांनी न्‍यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

या घरफोड्या १७ जुलैला स. ८.३० ते रात्री ११ वा. मुदतीत घडल्‍या होत्‍या. चोरट्याने दिनेश शशिकांत कोरगांवकर व त्‍यांचे शेजारी नीतेश रमेश देवळे यांच्‍या राहत्‍या घराच्‍या दर्शनी दरवाजाची कडी कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश करुन दोन मोबाईल, एटीएम कार्ड, रोख रक्कम, स्मार्ट वॉच व इतर कागदपत्र मिळून ५३ हजार १०० रुपयांचा मुद्‍देमाल चोरला होता. या गुन्‍ह्याचा समांतर तपास करताना सदर घरफोड्या राजू सुतार याने केल्‍याचे एलसीबी पथकाच्‍या तपासात निष्‍पन्‍न झाले. त्‍यानुसार पथकाने विरार गाठून त्‍याला अटक केली. राजू सुतार रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्‍याने कोल्हापूर, वैभववाडी, सांगली अशा भागांमध्‍ये घरफोडी, चोर्‍यांचे गुन्‍हा केले असल्‍याचेही एलसीबीच्‍या पथकाने सांगितले.

सदर कामगिरी पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांच्‍या सूचनेनुसार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्‍या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक सनिल पाटील, सहा.उपनिरीक्षक राजेंद्र जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर तवटे व किरण देसाई यांनी केली.

logo
Pudhari News
pudhari.news