

सावंतवाडी ः ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या हिवाळी विशेष गाड्यांच्या थांब्यांवरून आता वाद निर्माण झाला आहे. या गाड्यांना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या तालुक्यांत थांबे नसल्याने अखिल कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून, मध्य रेल्वेला यासंदर्भात निवेदन सादर केले आहे.
याबाबत समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, 01141/01142 मुंबई-करमळी आणि 01451/01452 लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुअनंतपुरम या विशेष गाड्यांना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आलेला नाही. भविष्यात जाहीर होणाऱ्या सर्व विशेष गाड्यांना माणगाव, महाड (वीर), खेड, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर थांबे देण्याची मागणी समितीने केली आहे. सुट्ट्यांच्या काळात नियमित गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांची मदार विशेष गाड्यांवर होती. मात्र, थांबे नसल्याने स्थानिकांचा हिरमोड झाला आहे. समितीने रेल्वे प्रशासनाकडून या प्रश्नावर त्वरित सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली असून, अन्यथा प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे.
हिवाळी व नाताळ सुट्टीसाठी ‘कोरे’ मार्गावर तीन गाड्यांच्या विशेष जादा फेऱ्या
कोकण रेल्वे मार्गावर मध्य व कोकण रेल्वेने हिवाळा आणि नाताळ सुट्यांमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत तीन गाड्यांच्या विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकण, गोवा, केरळ आणि कर्नाटक मधील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. कोकण रेल्वे मार्गावरून हिवाळी हंगाम तसेच नाताळ सणासाठी रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी गोवा, कोकण, कर्नाटक आणि केरळसाठी तीन महत्त्वाच्या मार्गांवर 22 डब्यांच्या विशेष गाड्या, सोडण्यात येणार असून, यामध्ये वातानुकूलित, स्लिपर आणि जनरल असे सर्व प्रकारचे डबे उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
सीएसएमटी-करमाळी एक्स्प्रेस
ही विशेष गाडी (01151//01152) 19 डिसेंबर ते 5 जानेवारी 2026 पर्यंत रोज धावणार आहे. मुंबई- सीएसएमटी स्थानकातून ही गाडी मध्यरात्री 12.20 वा. सुटून त्याच दिवशी दुपारी 1.30 वा. करमाळी येथे पोहोचेल. परतीसाठी ही गाडी करमाळी स्थानकातून दु.2.15 वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.45 वा. मुंबईत पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ व थिविम येथे थांबे आहेत.
एलटीटी - तिरुवनंतपुरम (साप्ताहिक) एक्सप्रेस
कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र-केरळ मार्गावरील अतिरिक्त गर्दीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस -तिरुवनंतपुरम (01171/01172) ही साप्ताहिक गाडी 18 व 25 डिसेंबर, तसेच 1 व 8 जानेवारी रोजी एलटीटीहून सांय.4 वा. सुटेल. तर दुसऱ्या दिवशी रात्री 11.30 वा. ती तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल. या गाडीला कोकणात ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ येथे थांबे आहेत.
एलटीटी - मंगळुरू (साप्ताहिक) एक्सप्रेस
एलटीटी-मंगळुरू (01185/01186) ही साप्ताहिक गाडी 16, 23 आणि 30 डिसेंबर, तसेच 6 जानेवारी रोजी सायं. 4 वा. एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी स. 10.05 वा. मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. परतीसाठी ही गाडी 17, 24, 31 डिसेंबर आणि 7 जानेवारी रोजी दु.1 वा. मंगळूर येथून सुटून दुसऱ्या दिवशी 6.50 वा. एलटीटी येथे पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडुपी, सुरतकल येथे थांबे आहेत.
गोवा राज्यामध्ये नाताळ सणासाठी तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी जातात. या कालावधीत होणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून पर्यटकांसाठी कोकण रेल्वेने या कालावधीत विशेष फेऱ्या सुरू केल्यामुळे कोकणसह गोवा, केरळ, कर्नाटक मधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.