

सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण नागरिकांना चांगली सेवा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी होत्या. गुरुवारी एका पोटात ट्यूमर असलेल्या महिला रुग्णाला गर्भवती असल्याचा अहवाल देत गोव्याला हलविण्यात आले. याची गंभीर दाखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली. शुक्रवारी सकाळीच थेट त्यानी वैद्यकीय महाविद्यालयात आकस्मिक भेट दिली व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णांना चांगली सेवा देता येत नसेल तर थांबू नकात! रुग्णसेवेतील मस्ती मी खपवून घेणार नाही, असा इशारा देत त्यांच्यावरील कारवाईचे संकेत दिले.
सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभाराच्या अनेक तक्रारी होत्या. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी वर्गावर कोणतेही नियंत्रण नाही. या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा व उपचार मिळत नाहीत. गंभीर रुग्णांना वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध होत नाहीत, अशा तक्रारी होत्या. या सर्वच कारभारावर डॉ. डवंगे यांचे नियंत्रण नाही अशाही तक्रारी होत्या. याची दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी तत्काळ घेतली व शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने भेट देत त्यांना जाब विचारला. येथे असेपर्यंत कोणतीही मस्ती नको, रुग्णांना चांगली रुग्णसेवा द्या असा मंत्री नितेश राणे यांनी त्यांना सुनावले.
एक महिला सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी रात्री सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास आढळून आली होती. याची माहिती मिळताच सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी महिलेला गरोदर असल्याचे जाहीर करत प्रसूती गुंतागुंतीची असल्याचे नमूद केले. त्यानंतर पहाटे सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिकेतून तिला अधिक उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले. मात्र गोवा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आलेल्या सखोल तपासणीत सदर महिलेला गर्भधारणा नसून तिच्या पोटात ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे प्राथमिक तपासणीतच एवढी गंभीर चूक कशी झाली, आवश्यक वैद्यकीय तपासण्या का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
चुकीच्या निदानामुळे संबंधित महिलेला मानसिक ताण सहन करावा लागला असून तिच्या आरोग्याशी गंभीर खेळ झाल्याची व या महाविद्यालयाच्या अशा अनागोंदी कारभाराची दखल मंत्री नितेश राणे यांनी तत्काळ घेतली. दरम्यान चार दिवसांपूर्वी कॅन्सरवर उपचार होत नसल्याने एका रुग्णाला थेट संभाजीनगरमध्ये रेफर करण्यात आले होते. इतक्या दूर रेफर करण्याची ही पहिलीच वेळ होती. याचीही दखल पालकमंत्र्यांनी घेतली. अनेक प्रश्न पालकमंत्र्यांनी डीन यांना विचारले. अनेक प्रश्नांची उत्तरे ते देऊही शकले नाहीत. अखेर रुग्णांना चांगली सेवा द्या. यापुढे चुका झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, अशी समजही पालकमंत्र्यांनी डीन यांना दिले.