

कणकवली : सिंधुदुर्गात भाजप, शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी या तीन पक्षांची महायुती झाली आहे. जि.प.च्या 50 आणि पं.स.च्या 100 जागांसाठी इच्छुकांची मोठी संख्या आहे. भाजपमध्ये तर एका एका जागेसाठी आठ ते दहाजण इच्छुक आहेत. ‘उबाठा’, ‘मविआ’सारखी परिस्थिती आमची नसून उमेदवार शोधण्याची गरज आम्हाला नाही. महायुती जाहीर झाल्यानंतर काही ठिकाणी नाराजी दिसत आहे. पण त्या सर्वांशी आमची चर्चा सुरू असून महायुतीत कुठेही बंडखोरी होणार नाही. आमच्या कार्यकर्त्यांसाठी खा. नारायण राणे यांचा शब्द अंतिम असून त्यांच्या शब्दाबाहेर कुणी नाही. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, त्यांचा योग्य सन्मान आम्ही राखणार असल्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री राणे म्हणाले, जि. प., पं. स. निवडणुकांसाठी महायुती जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये बंडखोरी होणार, राजीनामा नाट्य अशा काही बातम्या माध्यमांमध्ये आल्या. मुळात भाजपचा कार्यकर्ता हा प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खा. नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर कोणीही नाही. महायुतीतील सर्व प्रमुख नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. सर्व घडामोडींची माहिती एकमेकांना आम्ही देत आहोत. त्यामुळे बंडखोरीबाबतच्या कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवू नये. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने कुणाचं तरी मन दुखावणं हे अपेक्षित आहे. मात्र कालपासून आपण तसेच जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, दत्ता सामंत, आ. नीलेश राणे, दीपक केसरकर आम्ही सर्वजण कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत. येणाऱ्या काही दिवसात प्रत्येकाचे समाधान करण्याची ताकद व क्षमता आमच्यात आहे. केंद्रात, राज्यात आमची सत्ता आहे. सत्तेतील सर्व पदे उपलब्ध असून अनेक समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. जि.प., पं.स.वर पाच स्वीकृत सदस्यांची तरतूद आहे. त्यामुळे कोणालाही नाराज होण्याची गरज नाही, पालकमंत्री म्हणून निश्चितपणे कार्यकर्त्यांना ताकद देईन, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
रविवारी ओरोस येथील भाई सावंत यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत बोलताना ते म्हणाले, भाई सावंत हे निष्ठावंत कार्यकर्ते असून त्यांना पक्षात ताकद दिली जाईल. काही मतदारसंघात ‘दुसऱ्या भागातील उमेदवार नको, स्थानिकच द्या’ अशी मागणी आहे. प्रत्येक गाव व मतदारसंघाची परिस्थिती वेगळी असते. मात्र खा. नारायण राणे जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल. ही निवडणूक खा. नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढवत आहोत. कार्यकर्त्याना आम्ही भेटतोय, ते त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे जी काही नाराजी असेल ती दूर होताना दिसेल. ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना खाली हात ठेवणार नाही असे मंत्री राणे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागांबाबत चर्चा सुरू आहे. चर्चेनंतर त्यांना किती आणि कोणत्या मतदारसंघात जागा द्यायच्या याबाबत सध्या विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपमध्ये काही विरोधी पक्षांतील नेत्यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू असल्याकडे मंत्री राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची रांग मोठी आहे. काही प्रवेश हे फायद्याचे असतात तर काही अडचणीचे. कुणाला प्रवेश देताना तिथले स्थानिक कार्यकर्ते डिस्टर्ब होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. त्यामुळे थोडा विचार करून निर्णय घेवू असे मंत्री राणे यांनी सांगितले.