

कणकवली : सरकारच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. भारतीय कामगार संघटना आणि प्रत्येक कामगाराला मजबूत करण्यासाठी मी बांधकाम कामगार महासंघाच्या पाठीशी आहे. तुमच्या मुळेच आम्ही सत्तेत आलो आहोत. सरकार पातळीवरील सर्व योजना तुमच्या पर्यंत पोहोचविणार. मी तुमचाच माणूस आहे. जिथे अडचण असेल तेथे मला हाक द्या. फोन करा, असा विश्वास मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.
भारतीय मजदूर संघाच्या, बांधकाम कामगार महासंघ महाराष्ट्र प्रदेशचे 4 थे वार्षिक प्रदेश अधिवेशन कणकवली येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंत्री नितेश राणे बोलत होते. भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कणकवली माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहा. कामगार आयुक्त संदेश आयरे, भारतीय मजदूर संघ प्रदेश अनिल ढुमणे, भारतीय मजदूर संघाचे प्रदेश महामंत्री किरण मिलगिरी, प्रदेशाध्यक्ष हरि चव्हाण, प्रदेश संघटन मंत्री उमेश महाडिक, प्रदेश कोषाध्यक्ष बाळकृष्ण कांबळे, प्रदेश सरचिटणीस संजय सुरोशे, जिल्हाध्यक्ष भगवान साटम, जिल्हा कोषाध्यक्ष ओमकार गुरव, जिल्हा सचिव हेमंतकुमार परब आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ना. राणे म्हणाले, एखादा अधिकारी किंवा व्यक्ती कामगारांची फसवणूक करत असेल तर कोणाला सोडणार नाही. तुम्ही फक्त माहिती द्या. तुमच्या सारख्या सामान्य कामगारांना फसविताना कोण दिसला तर पुन्हा तो त्या पदावर असणार नाही, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला.