

Kankavli Atul Jadhav suspension Issue
सिंधुदुर्ग : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सध्या सुरू आहेत. त्यामध्ये मटका, गोवा बनावटीची दारू, जुगार, गांजा, चरस आदीसह अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रकारांना आळा घालण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस, महसूल आणि संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. परंतु, याकडे दुर्लक्ष करत कुठलीही कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे पालकमंत्री रितेश राणे यांनी स्वतः कणकवली शहरातील घेवारी नामक मटका बुकी अड्ड्यावर गुरुवारी दुपारी चार वाजता छापा टाकला होता.
यावेळी 12 जणांवर कारवाई करून 2 लाख 75 हजारांची रोकड, लॅपटॉप व मोबाईल, टेबल, खुर्च्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या कारवाईनंतर मंत्री राणे यांनी पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांना फोन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काय चालले आहे. पुढची पिढी बरबाद करायची आहे काय? पोलीस प्रशासन करतंय काय, असा संतप्त सवाल केला होता.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठवला. त्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले. मंत्री राणे यांनी छापा टाकलेले ठिकाण हे पोलीस स्टेशन पासून पाचशे मीटरच्या अंतरावर आहे. त्यानंतर कणकवली तालुक्यासह अन्य तालुक्यातील मटका घेणाऱ्या टपऱ्या बंद झालेल्या आहेत. तसेच अवैध धंदे देखील बंद झाल्याचे चित्र आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांची खात्या अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे. या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
तसेच पालकमंत्री रितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मटका गोवा बनावट दारू जुगार गांजा चरस अवैध वाळू या सर्वच अवैध व्यवसायामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरूण पिढी बरबाद होत आहे. त्यामुळे मी असे होऊ देणार नाही असे सांगत पत्रकार परिषदेत या सगळ्यांना खतपाणी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणारच आणि स्वतः हे धंदे उद्ध्वस्त करणार, असे सांगत हा ट्रेलर आहे , पिक्चर अजून सुरू व्हायचा आहे, असा सूचक इशारा दिला होता.