

मालवण : मी या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि आमदार म्हणून कार्यरत असलो, तरी त्याही आधी मी एक कट्टर हिंदू म्हणून तुमच्या सोबत सदैव उभा आहे. आपल्या हिंदू समाजाला बळकट करणे आणि त्याची सुरक्षा करणे हे माझे परम कर्तव्य आहे. ही रील्स स्पर्धा केवळ स्पर्धा नसून, हिंदू राष्ट्राला भक्कम करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी आंगणेवाडी येथे केले.
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक जत्रेचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सिंधुदुर्ग यांच्यावतीने हिंदू धर्मावर होणारी विविध आक्रमणे, लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि धर्मांतरण यांसारख्या गंभीर विषयांवर जनजागृती करण्यासाठी आयोजित रील्स स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे प्रभावी शस्त्र आहे. हे ओळखून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने या अनोख्या स्पर्धेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील रील्स स्टार्सनी लव्ह जिहाद आणि धर्मांतरणासारख्या ज्वलंत विषयांवर प्रभावी सादरीकरण केले.जत्रेला आलेल्या हजारो भाविकांसाठी मंदिरा शेजारील कार्यालयात मोठ्या स्क्रीनद्वारे हे रील्स प्रदर्शित करण्यात आले, ज्याला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश मंत्री मोहन साळेकर म्हणाले, आज आपल्या मुली लव्ह जिहादच्या शिकार होत असताना हे संकट दुसऱ्यावर आहे, मला काय त्याचे? ही वृत्ती घातक आहे. आंगणेवाडी जत्रेतही 25-30 टक्के स्टॉल विधर्मीयांचे आहेत. ज्यांची आमच्या देवावर श्रद्धा नाही, ते पूजेचे सामान कसे विकू शकतात? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. कोकणात मिनी पाकिस्तान आणि मिनी ख्रिस्तीस्थान उभे राहत असल्याचा इशारा देत त्यांनी जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र येण्याचे आवाहन केले.
या सोहळ्याला जिल्हा मंत्री आनंद प्रभू, जिल्हा बजरंगदल संयोजक कृष्णा धुरपंवर, कोकण विभाग संयोजक दत्तप्रसाद ठाकूर, मालवण बजरंग दल प्रखंड गणेश चव्हाण, विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री अमोल गावडे, विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, नंदकुमार आरोलकर, जिल्हा सहमंत्री चिन्मय रानडे, विलास हडकर, शिवप्रेमी शिल्पा खोत, विश्व हिंदू परिषद मालवण सहमंत्री हरेश पडते, बजरंग दल जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, तेजस चव्हाण, प्रसाद हळदणकर, स्वप्निल घाडी, पार्थ डिचवलकर, सिद्धनाथ नाटेकर, नीलेश साळगावकर, अथर्व केसरकर, सचिन वराडकर, गजानन मांजरेकर यांच्यासह विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन लारा मयेकर यांनी केले. ‘ही तर केवळ झाँकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे’ असा निर्धार करत आंगणेवाडीच्या पवित्र भूमीतून सुरू झालेला हा जागर भविष्यात अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.