

मुंबईमधील मराठा टक्का घसरण्यास मातोश्रीचे प्रमुख उद्धव ठाकरे हेच जबाबदार आहेत, असा घणाघाती आरोप पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केला. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे हिंदू द्वेषी आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर साधुसंतांना तुरुंगात टाकण्याचा कार्यक्रम होता; मात्र हिंदुत्ववादी सरकार आल्यामुळे त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले, असा गंभीर आरोपही राणे यांनी केला.
देवगड शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार अॅड.अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते. ना.राणे यांनी विजय वडेट्टीवार व उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. जागतिक दर्जाचे धर्मगुरू असलेल्या जगद्गुरू नरेंद्र महाराज यांच्यावर एकेरी उल्लेख करणारे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे हिंदू द्वेषी आहेत. नरेंद्र महाराज यांच्यावर एकेरी उल्लेख केला याबाबत उबाठाची भूमिका काय? उद्धव ठाकरे आता गप्प का? मुस्लिमांबद्दल बोलले असते तर मातोश्रीला मिरच्या झोंबल्या असत्या. निलमताई गोर्हे बोलल्या ते सत्यच असून त्या बोलल्या त्या मातोश्रीच्या वहिनींना झोेंबल्या आहेत. उबाठावाल्यांनी खुल्या व्यासपीठावर येवून बोलावे, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले.
जिहाद्यांची आमच्या गोमातेकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत होणार नाही.पक्ष वाचविण्यासाठी कितीही यात्रा काढा त्याची जत्रा होईल. यात्रेत सहभागी होण्यासाठी कार्यकर्तेही शिल्लक नाहीत. सक्षम कार्यकर्ते महायुतीमध्ये सामील होत आहेत, असे राणे म्हणाले. महाविकास आघाडीचे सरकार दलालीमधून आले आहे. मात्र, महायुतीचे सरकार हे पारदर्शी सरकार आहे, असेही राणे यांनी सांगितले.