

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ५ हजार मिलिमीटर पाऊस पडत असतानाही जिल्ह्याला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पावसाचे पाणी साठवून ठेवण्यात आणि त्याचे योग्य नियोजन करण्यात आपण कमी पडत आहोत. त्यामुळे पाणी व्यवस्थापन, जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याचा प्रभावी विनियोग यासाठी नागरिकांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
सिंधुदुर्ग बँक, सिंधू आत्मनिर्भर अभियान आणि भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने आयोजित ‘जल संवाद – उदक चालवावे युक्ती...’ या कार्यक्रमात ते बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल,सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला व बालविकास सभापती अनुराधा नारकर, सतीश सावंत, कृषी बाजार समिती अध्यक्ष तुळशीदास रावराणे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात पाऊस मुबलक पडत असतानाही सिंधुदुर्गला दुष्काळाच्या ट्रिगर-१ मध्ये समाविष्ट व्हावे लागणे ही चिंतेची बाब आहे. यावरून पाणी नियोजनात कुठेतरी आपण कमी पडत असल्याचे स्पष्ट होते. पावसाचे पाणी साठवणे, तलावांमधील गाळ काढणे, शहरांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारणे अशा उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा परिणाम कोकणावरही झाला असून, निसर्गनिर्मित संकटांबरोबरच मानवनिर्मित संकटे टाळण्यासाठी आपण सजग राहिले पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.
जिल्ह्यात १० हजार वनराई बंधारे बांधण्यासाठी दाखवलेली एकजूट कौतुकास्पद आहे. गावागावांतून उभ्या राहिलेल्या या चळवळीने राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर असून नागरिकांनी चिंता करू नये, सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.
तलावांमधील गाळ काढल्यास पाणीसाठवण क्षमता वाढू शकते. अनेक वर्षांपासून गाळ न काढलेल्या तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जि. प. सदस्य, पं. स. सदस्य आणि प्रशासनाने समन्वय साधून लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.