

वैभववाडी : पुढारी वृत्तसेवा
भारतीय संस्कृतीत मातीच्या पनीतीला विशेष महत्त्व आहे. पनीतीचा प्रकाश हा अंधकारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि निराशेून आशेकडे जाण्याची प्रेरणा देतो. याच पारंपरिक मातीच्या पण्यांवर नवदुर्गांची नऊ रूपे साकारत गडमठ येथील चित्रकार श्रुती संतोष सुतार यांनी कला, भक्ती आणि सांस्कृतिक परंपरेचा अनोखा संगम साधला आहे.
त्यांच्या या सूक्ष्म कलाकृतीने नवरात्रीच्या उत्सवात कलात्मक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित केले आहे. या चित्रांसाठी तिने ॲक्रेलिक रंगाचा वापर केला असून, प्रत्येक चित्राची उंची अवघी १.५ ते २ सेंटीमीटर आहे. इतक्या सूक्ष्म आकारात देवीची विविध रूपे साकारणे हे त्यांच्या कलाकौशल्याचे वैशिष्ट्य ठरते.
सूक्ष्म चित्रकलेतून सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांना स्पर्श श्रुती सुतार यांनी यापूर्वीही विविध माध्यमांवर सूक्ष्म चित्रकला साकारली आहे. रुईच्या पानावर हनुमान, गंधगोळीवर विठ्ठल, तुळशीच्या पानावर श्रीकृष्ण, मोरपिसावर श्रीकृष्ण, तसेच सूक्ष्म टिकलीवर नवदुर्गांची नऊ रूपे आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची चित्रे त्यांनी साकारली आहेत.
याशिवाय, वीणेवर विठ्ठल-रुक्मिणी आणि बासरीवर श्रीकृष्ण यांची कलाकृतीही त्यांनी निर्माण केली आहे. नवरात्रीच्या मंगलमय पर्वामित आपल्या या कलाकृतीतून त्यांनी सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मातीच्या पण्यांवरील नवदुर्गांची ही नऊ रूपे केवळ कलाकृती नसून, श्रद्धेचे प्रकाश आणि भारतीय संस्कृतीशी असलेले नाते जपणारा एक सुंदर कलाविष्कार आहे.