

सिंधुदुर्ग : मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून महापालिका निवडणुकांमध्ये असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. लवकरच पक्षाकडून याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आ. नीलेश राणे हे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनामध्ये आपली भूमिका सडेतोड आणि अभ्यासूपणे मांडतात. त्याशिवाय त्यांचं भाषणही प्रभावी असतं. नेमक्या शब्दात प्रभावी वाक्यरचनेमध्ये त्यांची भाषणे असल्यामुळे प्रेक्षकांकडून आणि कार्यकर्त्यांकडून ते नेहमीच टाळ्या घेतात. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये त्यांनी पैसे वाटपाचा मुद्दा महाराष्ट्रभर गाजवला होता. त्यानंतर मालवण नगरपालिकेवर निर्विवाद विजय मिळविला आहे. त्याशिवाय कणकवली नगरपंचायत निवडणुकीत त्यांनी पाठिंबा दिलेल्या शहर विकास आघाडीचा विजय झालेला आहे. त्यामुळे आमदार नीलेश राणे यांचा प्रभाव शिंदे शिवसेनेमध्ये वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महापालिकांच्या निवडणुकीमध्ये ते स्टार प्रचारक म्हणून असतील अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान शिवसेना संघटनेमध्ये त्यांच्याकडे नेतेपदही दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.