

कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरण दोन वर्षांपूर्वी घडले आहे. यातील संशयित सिद्धेश शिरसाट हा दोन वर्षापूर्वी शिवसेना (उबाठा) पक्षात होता. तत्कालीन आ. वैभव नाईक यांच्याच सोबत होता, असा प्रतिदावा आ. नीलेश राणे यांनी केला. वैभव नाईक यांना त्याचे सर्व धंदे माहित आहेत. त्यांच्यासोबत कितीतरी कार्यक्रमात तो सहभागी होता, याबाबत सविस्तर बोलणार आहे, असा इशाराही आ.राणे यांनी दिला.
सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांच्या खुन प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आ. वैभव नाईक यांनी संशयित सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? असा सवाल करत या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली. तसेच सिद्धेश हा शिंदेसेनेचा कार्यकर्ता असल्याचा दावा केला. त्याला शिवसेनेचे आ. नीलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले. आ.ि राणे यांनी याबाबत सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करीत म्हटले आहे, माजी आ. वैभव नाईक यांनी एक संशयित, जो एका मर्डर केस मध्ये जेल मध्ये आहे, त्याचे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आ. रवींद्र फाटक व माझ्या सोबतचे फोटो सोशल मिडीयावर टाकले आहेत. मात्र मूळत हे खून प्रकरण दोन वर्षांपूर्वी घडले आहे.त्यावेळी संशयित सिद्धेश शिरसाट हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच होता, वैभव नाईक यांच्याच सोबत तो वावरत होता. यामुळे पोलिसांनी या प्रकरणी वैभव नाईक यांनाच विचारणा केली पाहिजे. कारण सिद्धेश शिरसाटचे धंद, व्यवसाय याची माहिती कार्यकर्ता म्हणून वैभव नाईक यांना आहे. त्यांच्या सोबत त्याचे कितीतरी फोटो आहेत, त्यांच्यासोबत कितीतरी कार्यक्रमात तो वावरला आहे, याची माहिती आपण लवकरच पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहे.
मला तर शिवसेनेत येऊन आठ महिने झाले आहेत. मी तेव्हा भाजपात होतो. आपण एखादा आरोप करताना लोकांना विनोद वाटायला नको अस वैभव नाईकांनी बोलल पाहीजे. पण खोटे आरोप करणे हेच त्यांचे काम आहे, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, अशा शब्दांत आ. राणे यांनी वैभव नाईक यांना टोला लगावला. आ.राणे पुढे म्हणाले, खरतर हा विषय पैशाच्या वादातून सुरू झाला आणि तो क्राईम कडे वळला. यातून एकाचा खून झाला, त्या बॉडीचे काय केले? या चा शोध पोलीस घेणारच आहेत. पण वैभव नाईकांना या घटनेतही राजकारण दिसत. उद्या सिंधुदुर्गात गाडीखाली कुत्रा जरी मेला, तरी त्या घटनेत राणेंचा संबध कसा जोडता येईल, यासाठी ते प्रयत्न करतील, अश्या शब्दात त्यांनी नाईक यांच्या आरोपाची खिल्ली उडवली.