

मालवण : मंगळवारी नगरपरिषद निवडणुकांचा मतदानाचा दिवस असतानाच सोमवारची मालवण शहरातील रात्र मात्र जणू जागतीच राहिल्याचे चित्र होते. भाजपच्या पदाधिकार्यांची सुमारे दीड लाख रुपयांची रोख रक्कम असलेली कार रात्री 12 वाजण्याच्या सुमारास मालवण पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आणि त्यासोबत भाजपचे पदाधिकारीही ताब्यात घेतल्यानंतर ही माहिती कळताच मध्यरात्री शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी मालवण पोलिस स्थानकामध्ये जाऊन आक्रमक पवित्रा घेतला.
प्रचार संपल्यानंतर पैसे बाळगणार्या या लोकांवर कारवाई करावी यासाठी आमदार राणे पोलिस स्थानकाजवळ ठाण मांडून होते. रोख रक्कम बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आमदार नीलेश राणे यांनी मालवण येथे आलेल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि निवडणूक अधिकार्यांची भेट घेऊन कारवाईसाठी अधिकार्यांना प्रश्नांची सरबत्ती केली. पैशांचा नंगानाच चालला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
इतर नगरपालिकांप्रमाणेच मालवण नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार सोमवारी रात्री 10 वा. संपला. त्यानंतर मालवण पोलिस शहरात बंदोबस्त ठेवून होते. आमदार नीलेश राणे यांनी भाजपचे पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घरी पैसे वाटपासंबंधित स्टींग ऑपरेशन केल्यानंतर मालवण पोलिस सतर्क होतेच. तपासणी करताना निवडणूक विभागाचे पथक व पोलिसांना मालवण-पिंपळपार येथे एका कारमध्ये सुमारे दीड लाख रोख रक्कम व काही पाकिटे सापडून आली. पुढील तपासासाठी ही कार मालवण पोलिस ठाण्यात आणण्यात आली.
देवगड येथील भाजपा पदाधिकार्यांची ही कार (क्र. एमएच 07 एएस 6960) असल्याचे निष्पन्न झाले. या कारमध्ये भाजपचे देवगड भागातील पदाधिकारी होते. या कारमध्ये दीड लाख रुपयांची रोख रक्कम सापडल्यामुळे आणि प्रचाराची मुदत संपल्यानंतरही ते सापडल्यामुळे मालवण पोलिसांनी या कारसह कारमधील लोकांना मालवण पोलिस स्थानकात आणले.
त्यानंतर भाजपचे काही पदाधिकारी पोलिस स्थानकात पोहोचले. ही माहिती याचवेळी त्याठिकाणी उपस्थित झालेल्या शिवसेना पदाधिकार्यांनी आमदार नीलेश राणे यांना दिली. आमदार निलेश राणे स्वतः गाडी घेऊन मालवण पोलिस ठाण्यात रात्री 1.10 वा.च्या सुमारास ते दाखल झाले. त्याचवेळी मालवण येथील भाजपा पदाधिकारी निघून जात होते.
ही माहिती शिवसेना पदाधिकार्यांना कळताच ते पुढे धावले. यावेळी आमदार निलेश राणे यांनी सर्व कार्यकर्त्यांना संयम ठेवण्याच्या सूचना केल्या. पोलिसांना त्यांचे काम करू द्या, कायदा हातात कोणीही घेऊ नये असे कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितले. तोवर पोलिस ठाण्याबाहेर शेकडो कार्यकर्ते जमा झाले आणि मध्यरात्री मालवणमध्ये निवडणूकपूर्व तणाव निर्माण झाला.
नंबर प्लेट नसलेल्या गाडीचा पंचनामा
एक नंबर प्लेट नसलेली कार तिथे होती. यावेळी आमदार निीनलेश राणे म्हणाले, काय चालले पहा. नंबर प्लेट नसलेली गाडी आहे. हे दाखवताच पोलिसांनी मालवण येथील त्या दोन भाजप पदाधिकार्यांची कार थांबवली. कारला नंबर प्लेट नव्हती. ती कार पोलिस ठाण्यात आणत निवडणूक विभागाचे पथक, पोलिसांनी कारचा पंचनामा केला.
संपूर्ण कारची पाहणी करण्यात आली. भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप ऊर्फ बाबा परब यांच्यावरही मोटार वाहन कायदा 1988 कलम 50, 177, भा. दं. सं. 2023 : अंतर्गत कलम 171 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. गाडीला नंबर प्लेट नसणे व गाडीत भाजपा संबंधित साहित्य आढळणे हेही या कारवाईचे कारण ठरले आहे.
दरम्यान, आमदार नीलेश राणे यांनी या संपूर्ण प्रकरणी ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका घेतली. आधी पैसे घरी मी पकडून दिलेल्या लोकांवर गुन्हा दाखल न करता माझ्यावरच गुन्हा दाखल केला. आता या तिन्ही पदाधिकार्यांवर ठोस कारवाई झालीच पाहिजे; तोवर मी इथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली.
आमदार नीलेश राणे यांनी त्याचठिकाणी ठाण मांडले. तर ज्या गाडीत पैसे सापडले त्या गाडीतील भाजपा पदाधिकारी व मालवण येथील भाजपा पदाधिकारी यांना पोलिसांनी पोलिस ठाण्यात थांबवून ठेवले होते. दोन तासानंतर डीवायएसपी पोलिस ठाण्यात आले. कारवाई होणार, असे त्यांनी सांगितले. मात्र तत्काळ कारवाई झाली पाहिजे, या भूमिकेवर आमदार निलेश राणे ठाम राहिले.
देवगड भाजपा तालुकाध्यक्ष महेश नारकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब, अजिंक्य पाताडे आणि एक असे हे चारजण भाजप पदाधिकारी पोलिस स्थानकात असल्याचे आ. नीलेश राणे म्हणाले. नंबर प्लेट नसलेली कार बाबा परब यांची असून देवगडमधून आलेले भाजपचे पदाधिकारी हे महेश नारकर आहेत, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.