

सावंतवाडी ः आंबोली नांगरतास येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (अख) मदतीने उसाच्या नवीन प्रजाती विकसित केल्या जात आहेत. या नवीन प्रजातींमध्ये कमी पाणी, खत आणि अधिक साखर उत्पादन करण्याची क्षमता असेल, असा विश्वास माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्रात 300 हून अधिक ऊसाच्या प्रजातींची बँक तयार करण्यात आली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन प्रजाती विकसित करण्याचे काम मागील दीड वर्षांपासून सुरू आहे. नवीन प्रजाती यशस्वी झाल्यास ऊस उत्पादनात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकार या संशोधनाला सकारात्मक प्रतिसाद देत असून केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे.
आंबोली हे ठिकाण भौगोलिकदृष्ट्या ऊस संशोधन केंद्राला अनुकूल आहे. या केंद्रात 300 जातीचे ऊस आहेत. नवीन संशोधन करून सतत प्रजाती करण्यावर शास्त्रज्ञ व संशोधकांनी भर दिला आहे. नवीन ऊस संशोधन प्रजातीला कमी खत, पाणी कमी राहील व साखर अधिक मिळेल, असे जे संशोधन करण्यात आले आहे, ते एआयच्या माध्यमातून गेले वर्ष-दीड वर्ष हे काम सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवीन प्रजाती करून आणि साखर जास्त मिळेल असा प्रयत्न सुरू आहे. तो यशस्वी झाला तर एक प्रकारची क्रांतीच घडेल.
शरद पवार यांनी वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रालाही भेट दिली, जिथे काजूच्या नवीन प्रजाती विकसित केल्या जात आहेत. ते म्हणाले, कोकणातील शेतकर्यांना काजू उत्पादनात वाढ मिळवून देण्यासाठी फळ प्रक्रिया उद्योगावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक माजी संचालक व्हिक्टर डान्टस उपस्थित होते.