Mahashivratri festival : नेरूरचा जागृत श्री देव कलेश्वर

येथील महाशिवरात्र उत्सव म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि उत्साह यांचा अद्वितीय संगमच!
Mahashivratri festival
नेरूरचा जागृत श्री देव कलेश्वर
Published on
Updated on

सह्याद्रीच्या कुशीत, कर्ली नदीच्या नितळ काठावर वसलेले कुडाळ तालुक्यातील नेरूर-देऊळवाडा हे गाव आज पुन्हा एकदा भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. स्वयंभू श्री देव कलेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या भूमीत साजरा होणारा महाशिवरात्र उत्सव म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि उत्साह यांचा अद्वितीय संगमच!

स्वयंभू देवस्थानाची पावन परंपरा

नेरूरचे श्री देव कलेश्वर मंदिर हे प्राचीन आणि शैववैष्णव भेदापलीकडील एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. चहूबाजूंनी डोंगररांगा आणि शेजारीच असलेला कलेश्वर तलाव या मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. मंदिरात शिवलिंगाच्या उजव्या बाजूस गणपती, डावीकडे नंदी, पिंडी व नंदीच्या मध्ये अपवादात्मक अशी शुक्राचार्याची मूर्ती हे या देवस्थानाचे खास वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या डाव्या बाजूस ब्रह्मदेव मंदिरात ब्रह्मा, विष्णू, गायत्री, सावित्री आणि लक्ष्मी या देवतांची प्रतिष्ठापना आहे. गेली कित्येक पिढ्या अखंडपणे चालत आलेली महाशिवरात्रीची परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जाते. सिंधुदुर्गसह मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक अशा विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने येथे भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी वाढणारी भाविकांची गर्दी हेच या जागृत देवस्थानाचे सामर्थ्य दर्शवते.

आख्यायिकेतील चमत्कार

या देवस्थानाशी निगडित असलेली आख्यायिका श्रद्धेला अधिक दृढ करणारी आहे. पूर्वी दाट जंगलात एका गायीने विशिष्ट ठिकाणी पान्हा सोडण्याचा चमत्कार घडवला. दृष्टांतानुसार खोदकाम केल्यावर तेथे ‌‘रूजीव शिवलिंग‌’ सापडले. त्याच ठिकाणी विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करून आजचे स्वयंभू श्री देव कलेश्वर प्रकट झाले. तेव्हापासून हे स्थान भक्तांच्या मनोभावनांचे केंद्र बनले आहे.

पार्वती पते हर हर महादेव... भक्तिरंगात रथोत्सव

महाशिवरात्रीच्या पाचव्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून दर्शनासाठी रांग लागते. मध्यरात्रीनंतर आकर्षक विद्युत रोषणाईतून पाच माळ्यांच्या, कोरीव लाकडी रथातून श्रींची भव्य मिरवणूक काढली जाते. फटाक्यांची आतषबाजी, वाद्यवृंदांचा निनाद आणि “पार्वती पते हर हर महादेव”चा गजर यामुळे वातावरण दुमदुमून जाते. मंदिराभोवती परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर दशावतारांकडून दहीकाला व राधाकृष्ण नृत्य सादर होते. त्यानंतर उत्सवमूर्ती मुख्य मंदिरात नेऊन उत्सवाची सांगता होते. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात धार्मिक विधींसह पखवाज शिवतांडव, कीर्तन, पुराण-पालखी मिरवणूक, दशावतारी नाटक अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. श्री तुषार परब व शिष्यवर्ग यांचे पखवाज वादन, ह.भ.प. धोंड बुवा यांचे कीर्तन, तसेच श्री देव कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे सादरीकरण हे भाविकांसाठी पर्वणीच ठरते.

श्रद्धेचा अखंड दीप

नेरूरच्या प्रत्येक घरात, प्रत्येक चेहऱ्यावर आज आनंदाची लकेर उमटली आहे. महाशिवरात्र म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर गावाच्या श्रद्धेचा, ऐक्याचा आणि परंपरेचा जागर आहे. स्वयंभू श्री देव कलेश्वरांच्या चरणी नतमस्तक होताच भक्तांच्या मनात पुन्हा-पुन्हा या तीर्थक्षेत्राकडे येण्याची ओढ निर्माण होते.या पावन सोहळ्यात सहभागी होऊन भक्तांनी ‌‘हर हर महादेव‌’च्या जयघोषात सामील व्हावे, असे आवाहन श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती, नेरूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पुरवणी संकलन

प्रमोद म्हाडगुत, विठ्ठल राणे, काशिराम गायकवाड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news