

ओरोसः जिल्हयात 22 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून जिल्हयात 346 ठिकाणी सार्वजनिक नवदुर्गा मुर्ती व घटप्रतिमा तर 40 खाजगी दुर्गामातेची व घटप्रतिस्थापना करण्यात येणार आहे. दरवर्षीपेक्षा सार्वजनिक आणि खाजगी दुर्गादेवी आणि घट प्रतिमा पूजनाची संख्येत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात 22 सप्टेंबर घटस्थापनेपासून विधिवत नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्त सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळे, तसेच विविध मंदीरे तसेच खाजगी घरांमध्ये दुर्गा स्थापने निमित्त जय्यत तयारी सुरु असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या उत्सवानिमित्त डबलबारी भजन, फुगड्या ,रास दांडिया ,नृत्य, रासक्रीडा, वेशभूषा, आदि स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमामुळे नवरात्रोत्सवात नऊ दिवस जिल्ह्यात आनंदी वातावरण असणार आहे.
जिल्ह्यात 130 ठिकाणी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळातर्फे दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तसाच सार्वजनिक घट प्रतिमा पुजन 216 ठिकाणी होणार आहे. सार्वजनिक नवदुर्गा पुजन यामध्ये दोडामार्ग 15, बांदा 8, सावंतवाडी 14, कुडाळ 13, वेंगुर्ले 10, निवती5, सिंधुदुर्गनगरी 4, मालवण 1 6, आचरा 4, देवगड 10, विजयदुर्ग 6, कणकवली1 5, वैभव वाडी 10 आदी ठिकाणी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना सार्वजनिकरित्या करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्ह्यात खाजगी दुर्गादेवी 40 ठिकाणी स्थापना होणार असून दोडामार्ग 4, वेंगुर्ले 4, कुडाळ 2,मालवण 9 विजयदुर्ग 2, सिंधुदुर्गनगरी1, देवगड 8, सावंतवाडी 10 आदी दुर्गादेवीची खाजगीरित्या स्थापना करण्यात येणार आहे. तसेच खाजगी प्रतिमापुजना मध्ये निवती 2, मालवण 1, विजयदुर्ग 3 आदी 6 आहेत.
2 ऑक्टोबर विजयादशमी रोजी नवरात्रोत्सवाची सांगता होणार असून दुर्गा मातेच्या विसर्जनाच्या मिरवणूका निघणार आहेत. अतिशय शांततेत व आनंदात हा नवरात्रोत्सव पार पडावा यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
तरी जिल्ह्यातील नागरिकांनी नवरात्रोत्सव आनंदात साजरा करावा व या उत्सवाची शांततेत सांगता करावी. असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मोहन दहिकर यांनी केले आहे.