

ओरोस : मत्स्यव्यवसाय विभागाने भारतीय कृषी संशोधन परिषद केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था (ICAR-CMFRI) आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने पाचवी सागरी मत्स्य जनगणना 3 नोव्हेंबर ते 18 डिसेंबरदरम्यान होणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त सागर कुवेसकर यांनी दिली.
या सागरी मात्स्यिकी जनगणनेचे उद्दिष्ट सुमारे 12 लाख मत्स्य व्यवसायिक कुटुंबे, 568 मत्स्य गावे आणि 173 मत्स्य उतरण केंद्रांबद्दल अचूक आणि तत्काळ माहिती संकलित करणे तसेच मत्स्य व्यवसाय क्षेत्रामध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांबद्दल व्यापक माहिती गोळा करणे आहे. प्रथमच आर्थिक स्थिती, विविध उपजीविका आणि शासन योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती एका अत्याधुनिक ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे गोळा केली जात आहे.
या जनगणनेकरीता CFMFI (केंद्रीय समुद्री मत्स्य अनुसंधान संस्थान, कोची) ने तयार केलेल्या तूरी Vyas NAV या अॅपसह टॅबलेट पी.सी. वितरित केले जात आहेत. ज्याद्वारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण व समावेशन केले जाईल आणि जनगणना चौकटीची अचूकता सुनिश्चित केली जाईल. ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी आणि व्यापक मोहीम आहे. यामधून मिळणारे निष्कर्ष धोरणनिर्मितीस मार्गदर्शन करतील. मत्स्य समुदायांच्या उपजीविकेचे बळकटीकरण व विकासाला नवी गती देतील.