

सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या महामार्गाला विरोध करणार्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्या, असे आवाहन खा. नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. आडाळी एमआयडीसीमध्ये पाचशेहून अधिक उद्योग मी आणणार आहे. त्यासाठी जिंदाल आणि अंबानी यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग दौर्यावर असलेले खा. राणे यांनी सोमवारी येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे, प्रमोद कामत, शेखर गावकर, मोहिनी मडगावकर, परिमल नाईक, रवींद्र मडगावकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, मनोज नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांनी ‘शक्तीपीठ’ महामार्गाला जिल्ह्यातून होत असलेल्या विरोधाबाबत विचारले असता, राणे यांनी कठोर शब्दात उत्तर दिले. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चौफेर विकास व्हायला पाहिजे, तर शक्तिपीठ महामार्ग होणे गरजेचे आहे. आज ज्यांना कोण विचारत नाही ते या महामार्गाला विरोध करत आहेत. ‘जंगले आम्ही राखली’, असे म्हणणार्यांनी जंगले राखण्यासाठी नेमके काय केले? असा प्रतिसवाल त्यांनी केला. तसेच या महामार्गाला केवळ राजकीय विरोधासाठी विरोध करणार्या लोकांना त्याच भाषेत उत्तर द्या, असे आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केले.
आडाळी एमआयडीसीमध्ये उद्योग आणण्याबाबत खा.राणे म्हणाले, त्या ठिकाणी 500 हून अधिक उद्योग आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. मोठे उद्योग यावेत आणि त्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी मी जिंदाल आणि अंबानी या मोठ्या उद्योगपतींशी बोलणी करत आहे. जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा, यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि दिलेला शब्द पूर्ण करणार आहे.
कासार्डे येथील सिलिका मायनिंगसारख्या उद्योगाला विरोध करणार्यांवर टीका करताना राणे म्हणाले, ज्यांनी आयुष्यभर कमावले, तेच आता त्याला विरोध करत आहेत. हे योग्य नाही. लवकरच आपण संबंधित पाचही जणांची माहिती उघड करणार आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत विचारले असता, जे संपले त्यांच्याबद्दल काय बोलायचे? ते कितीही एकत्र आले तरी आता काही फरक पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.
राज्यात आणि देशात भाजपचे सरकार आहे. जिल्ह्यात मी खासदार आहे, नितेश राणे पालकमंत्री आहेत आणि नीलेश व दीपक केसरकर आमचे आमदार आहेत. त्यामुळे आम्ही सर्व मिळून निश्चितपणे जिल्ह्याचा विकास करणार आहोत, असा विश्वास राणेंनी व्यक्त केला.
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील इकोसेन्सिटिव्ह गावांबद्दल बोलताना राणे म्हणाले की, या संदर्भात केंद्रीय पर्यावरणमंत्र्यांशी चर्चा करणार आहे, जेणेकरून रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील. कासार्डे येथील सिलिका मायनिंगला विरोध करणार्यांवर त्यांनी टीका केली आणि लवकरच त्यांची माहिती उघड करणार असल्याचे सांगितले.
सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील 25 हून अधिक गावे इकोसेन्सिटिव्ह जाहीर करण्याबाबत राणे म्हणाले, या ठिकाणी विकास होणे गरजेचे आहे. इकोसेन्सिटिव्हसारखा प्रश्न बाजूला ठेवून, रोजगार निर्मितीसाठी काही करता येईल का, या संदर्भात मी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
खा. नारायण राणे