

कणकवली ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये अखेर भाजप-शिवसेना युतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. विरोधकांना फारशी संधी न देता युती करून भाजप-शिवसेनेने हा मोठा राजकीय डाव टाकला आहे. महायुतीची घोषणा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे नेते खा. नारायण्ा राणे यांनी शुक्रवारी कणकवली येथे पत्रकार परिषदेत केली. जागा वाटपाचा फॉर्मुला शनिवारपर्यंत जाहीर होईल असेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेला दोन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते.
येथील प्रहार भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, आ. दीपक केसरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, संजू परब, उपनेते संजय आग्रे, माजी आ. प्रमोद जठार, अजित गोगटे, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला आघाडीप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, काका कुडाळकर, संदीप कुडतरकर उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षांची आज एकत्र बैठक झाली. या बैठकीत जि.प., पं.स. निवडणूक सिंधुदुर्गात वरिष्ठांच्या आदेशाने महायुती करून लढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी युती करून निवडणूक लढवण्याच्या निर्णयाचा आनंद व्यक्त केला आहे. या निवडणूकीत नक्कीच आम्ही जि.प. च्या सर्व 50 आणि पं.स. च्या सर्व 100 जागा जिंकू आणि विरोधकांचा धुव्वा उडवून विजय मिळवणार असा निर्धार आजच्या बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी केल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे यांनी सांगितले.
खा. नारायण राणे म्हणाले, या निवडणूकीच्या प्रचारात आम्ही या जिल्ह्याचा कायापालट कसा केला हे सांगणार आहोत. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या मूलभूत पायाभूत सुविधांची आम्ही पूर्तता केली. जिल्ह्याचा विमानतळ सुरू केले. या विमानतळाच्या भूसंपादनाला विरोधकांनी विरोध केला होता मात्र तरीही आम्ही विमानतळ पूर्ण करून वाहतूक सुरू केली. चौपदरी महामार्ग केला तसेच शैक्षणिक, आरोग्यासह सर्वच बाबतीत आम्ही भरीव असे काम करून नागरिकांचे जीवन सुखमय कसे होईल याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला. आम्ही केलेल्या कामांची जनतेला जाणीव आहे. 1990 साली आपण ज्यावेळी जिल्हयात आलो त्यावेळी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न 35 हजार होते ते आता 2 लाख 60 हजारापर्यंत पोहोचले आहे. त्याचे श्रेय विरोधकांपर्यंत अजिबात जात नाही. शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक सुविधांमध्ये विरोधकांचा 1 टक्काही सहभाग नाही. विरोधी पक्षातल्या नेत्यांनी शाळा, कॉलेज किंवा एकही उद्योग सुरु केलेला नाही. जनतेला हे सर्व माहित आहे. सातत्याने आम्ही जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही संपर्कात असतो. त्यामुळे जनतेकडे मते मागण्याचा नैतिक अधिकार भाजप-शिवसेना युतीलाच आहे. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे खा. नारायण राणे यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील भाजप-शिवसेनेच्या विजयाबाबत बोलताना खा. राणे म्हणाले, मुंबईसह राज्यात ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या त्यात विरोधकांचा धुव्वा उडाला आहे. भाजप आणि शिंदे शिवसेना महायुतीने जो विजय मिळवला आहे त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आपण अभिनंदन करतो असे खा. राणे यांनी सांगितले. जिल्ह्यात भाजप आणि शिंदे शिवसेना यांची युती झाली असली तरी त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सहभाग आहे का? या प्रश्नावर बोलताना खा. राणे यांनी त्यांच्याकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगितले.