

वैभववाडी : नापणे धबधब्यावर उभारण्यात आलेला काचेचा पूल हा महाराष्ट्रातील अशा प्रकारचा पहिला पूल आहे. या पुलामुळे नापणे धबधबा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ झाले आहे. यामुळे वैभववाडीच नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मत्स्य व बंदर विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी केले.
बारमाई वाहणारा म्हणून प्रसिद्ध नापणे धबधब्यावर सिंधू रत्न योजनेतून 99 लाख 63 हजार रुपये खर्च करून अभिनव पद्धतीचा काचेचा पूल तयार करण्यात आला आहे. या पुलाचे लोकार्पण मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. ना. राणे म्हणाले, या धबधब्याच्या पर्यटन विकासासाठी तत्कालीन पालकमंत्री दीपक किसरकर यांनी ‘सिंधू रत्न’ योजनेच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला. नापणे धबधब्यावरील या काचेच्या पुलामुळे या ठिकाणी येणार्या पर्यटकांमध्ये वाढ होणार असून यातून स्थानिकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. या धबधब्यावर आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. पर्यटकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने या ठिकाणी कायम होमगार्डची टीम तैनात करण्यात येईल. तसेच आवश्यकता वाटल्यास सीसीटीव्ही लावण्यात येतील. पर्यटकांनी आनंद घेत असताना योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन आनंद घ्यावा. एकावेळी 25 पेक्षा जास्त लोकांनी पुलावर जाऊ नये. हा पूल आपल्या सर्वांचा आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षितेची काळजी सुद्धा घेण्याची जबादारी आपली सर्वांची आहे.सार्वजनिक बांधकाम व पोलिसांकडून लावण्यात आलेल्या सूचनांचे पर्यटकांनी काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर, सा. बां. कणकवली विभागाच्या कार्यकारी अभियंता विणा प्रभू, उपाभियंता श्री. जोशी आदी अधिकारी तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे, प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, नासीर काझी, अरविंद रावराणे, जयेंद्र रावराणे, शारदा कांबळे, प्राची तावडे, हुसेन लांजेकर, स्वप्नील खानविलकर, किशोर कांबळे, स्वप्नील धुरी, प्रकाश पाटील, बंडया मांजरेकर, मनोज रावराणे, सीमा नाणीवडेकर, नापणे सरपंच लीना पांचाळ, महेश सांसरे आदी उपस्थित होते.