Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर मृत्यूचा सापळा!

पणदूरतिठ्यावर सर्व्हिस रस्त्याला मोठी भेग; पावसाळ्यात रस्ता खचण्याची भीती
Mumbai Goa Highway
Mumbai Goa Highway
Published on
Updated on

कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पणदूरतिठा येथे महामार्गाच्या कामातील त्रुटी पुन्हा समोर आल्या आहेत. येथील एका बाजूच्या सर्व्हिस रस्त्याला मधोमध मोठी भेग पडली असून, पावसाळ्यात हा रस्ता खचून गंभीर दुर्घटना घडण्याची भीती आहे. या धोकादायक स्थितीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मातीचा भराव ठरतोय धोकादायक

पणदूरतिठा येथील बॉक्सेलजवळ कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याच्या मधोमध काही अंतरापर्यंत मोठा तडा गेल्याचे दिसून येत आहे. हा रस्ता मातीचा मोठा भराव टाकून त्यावर डांबरीकरण करून तयार करण्यात आला होता. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम किंवा भरावाच्या तांत्रिक त्रुटींमुळे रस्त्याला भेगा पडू लागल्या आहेत. यामुळे हा रस्ता कधीही खचू शकतो, अशा स्थितीत असून वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वाहतुकीचा मोठा ताण

सदर सर्व्हिस रस्ता स्थानिक वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दिवसभर एसटी बस, दुचाकी, चारचाकी आणि अवजड मालवाहू वाहनांची मोठी रहदारी सुरू असते. सद्यस्थितीत रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. आता, पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाचे पाणी या भेगांमध्ये शिरल्यास रस्ता खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रस्त्याला पडलेली ही भेग म्हणजे आगामी संकटाची नांदी आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करणे आणि संरक्षक भिंत किंवा आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे आहे. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आणि भविष्यात काही अपघात झाला, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news