

सावंतवाडी : देशात पेट्रोल, डिझेल दरवाढ पाहता एसटी महामंडळाला ३१० कोटी रुपयांचा घाटा सहन करावा लागत आहे. तरी ही सेवा सुरूच राहणार असून सध्या तरी एसटीची कोणतीही प्रवासी भाडेवाढ केली जाणार नाही, अशी माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी सायंकाळी सावंतवाडी येथे आ. दीपक केसरकर यांच्या शिवसेना कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री सरनाईक म्हणाले, पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळाला ३१० कोटी रुपयांचा घाटा सहन करावा लागत आहे. अतिरिक्त पैशाचा भार एसटी महामंडळावर पडत आहे. तरीही प्रवासी तिकीट दरवाढ करण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मात्र डिझेल दरवाढ अशीच होत राहिली तर भविष्यात तिकीट दरवाढीचा कटू निर्णय घ्यावा लागेल, हे निश्चित.
एसटी बसस्थानकापासून २०० मीटर अंतरात जर खासगी बसेस प्रवासी वाहतूक करत असतील तर अशा गाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन अधिकाऱ्यांना दिले, असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले. सन २०३५ नंतर सर्व एसटी बसेस इलेक्ट्रिक असतील. एकही बस डिझेलची नसेल. सध्या काही प्रमाणात इलेक्ट्रिक बसेस चालू करण्यासाठी प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आजपासून एसटीची स्वच्छतागृहे, शौचालये मोफत
१ जून हा एसटी महामंडळाचा ७८ वा वर्धापन दिन असून या दिवसापासून राज्यातील सर्व एसटी डेपोमधील स्वच्छतागृहे व शौचालय ठेकेदारांकडून काढून घेऊन ती मोफत करण्यात आली आहेत. त्याठिकाणी सौर ऊर्जा तंत्रज्ञान वापरले जावे, असे निर्देश दिले आहेत. तर सर्व डेपोची यांत्रिक स्वच्छता राखली जाईल, अशी माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.