MSRTC Recruitment 2026 | कंत्राटी अथवा नियमित, कर्मचारी भरती एकदा कराच

रिक्त पदांचा भार एसटी महामंडळाला सोसवेना; कार्यरत कर्मचाऱ्यांची ओढाताण
MSRTC
MSRTC (Pudhari Photo)
Published on
Updated on
Summary
  • २०१६ पासून चालक, वाहक भरतीच नाही

  • सिंधुदुर्गात चालक, वाहकांची ३०० पदे रिक्त

  • कंत्राटी भरतीही होईना

  • पद भरतीसाठी वित्त विभागाची मान्यता कधी?

अजित सावंत

कणकवली : एसटी महामंडळामध्ये लवकरच १७ हजार ७४२ चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधीमंडळात केली आहे. खरेतर यापूर्वीही त्यांनी ऑक्टोबर २०२५ मध्ये नियमित पद भरतीला मान्यता मिळेपर्यंत कंत्राटी पद भरतीची घोषणा केली होती. मात्र त्याला सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी प्रत्यक्ष पद भरतीला मुहूर्त मिळालेला नाही. महामंडळामध्ये सन २०१६ पासून कर्मचारी भरती झालेली नाही. त्यामुळे रिक्त पदांचा मोठा फटका महामंडळाला बसत असून हा भार आता सोसवेना झाला आहे. सिंधुदुर्ग विभागाचा विचार करता या विभागात चालक, वाहकांची सुमारे ३०० पदे रिक्त असून दर दिवशी प्रत्येक आगारातील २५ चालक, वाहकांना ओव्हर टाइम ड्युटी करावी लागत असल्याने त्यांची ओढाताण होत आहे.

महाराष्ट्रच्या खेडोपाड्यात धावणारी एसटी प्रवासी वाहतूक आजही सर्वसामान्य जनतेसाठी तेवढीच महत्त्वाची सेवा आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेले एसटी महामंडळ मात्र आज अनेक आव्हानांचा सामना करत आहे. एसटी महामंडळामध्ये गेल्या १० वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर चालक, वाहक, यांत्रिक तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची संख्या वाढली आहे. नियमित भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून झालेली नसल्याने विविध पदांवर मोठ्या प्रमाणावर कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती झाली होती.

एसटीत सव्वा लाख कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ ७० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. रिक्त असलेल्या कर्मचारी पदांमुळे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण वाढला आहे. अनेक विभागांमध्ये कार्यरत चालक, वाहकांना ओव्हर टाईम ड्युटी करावी लागत आहे. २०२२ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाने ३० विभागांमध्ये २ हजार १२५ चालकांची कंत्राटी नियुक्ती केली होती. मात्र संप संपताच त्यांना कमी करण्यात आले होते. मात्र त्यानंतर नवीन भरती झालेली नाही.

दरम्यान ऑक्टोबर २०२५ मध्ये नवीन पद भरतीला शासनाची मान्यता मिळेपर्यंत कंत्राटी भरतीची घोषणा करण्यात आली. त्यासाठी सहा रिजनमध्ये कंत्राटी भरतीसाठी निविदा काढून सहा एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याला सहा महिने उलटले तरीही भरती झालेली नाही. १५ एप्रिलपर्यंत चालक, वाहकांची कंत्राटी भरती होईल असे सांगितले जात आहे. नुकतीच परिवहन मंत्र्यांनी १७ हजार ७४२ नियमित कर्मचारी भरती करण्याची घोषणा केली आहे. मात्र वित्त विभागाच्या मान्यतेनंतरच खऱ्या अर्थाने मुहूर्त स्वरूप येणार आहे. राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता वित्त विभागाकडून नियमित भरतीला हिरवा कंदील मिळेल की नाही? याबाबत साशंकताच आहे.

२०२० मध्ये आलेले कोरोना संकट आणि त्यानंतर २०२२ मध्ये कर्मचाऱ्यांचा संप यामुळे एसटी महामंडळाचे आर्थिक गणित बिघडले होते. महामंडळाची बिघडलेली ही आर्थिक घडी आता पुन्हा रुळावर येताना दिसत आहे. त्यामुळेच परिवहन मंत्र्यांनी महामंडळामध्ये १७ हजार ७४२ पद भरतीची घोषणा केली आहे. अर्थात या भरतीला प्रत्यक्ष मुहूर्त कधी मिळणार यावरच सारे काही अवलंबून आहे.

नवीन बस खरेदी; पण तेवढ्याच बसेस स्क्रॅपमध्ये

सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार बसेस आहेत. दोन वर्षांपूर्वी महायुती सरकारने दरवर्षी ५ हजार नवे बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ८ हजार बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ३ हजार बसेसचे वितरण सुरू झाल्याची माहिती विधीमंडळात परिवहन मंत्र्यांनी दिली. सिंधुदुर्ग विभागाचा विचार करता या विभागाकडे सद्य स्थितीत ३७० गाड्या आहेत. २०२० पासून आतापर्यंत ७० नवीन बसेस या विभागाला मिळाल्या. मात्र १७६ बसेस स्क्रॅपमध्ये गेल्या. या विभागाकडे ७६ सीएनजी बसेस आहेत. त्यात कुडाळ आगाराकडे ४० आणि वेंगुर्ले आगाराकडे ३६ सीएनजी बसेस आहेत. या बसेस पर्यावरण पूरक असल्या तरी महामंडळाचे सीएनजी पंप अद्यापपर्यंत उभारले नसल्याने खाजगी पंपावरून त्यांना सीएनजी भरावा लागतो. दर दिवशी विभागातील ७ कर्मचारी केवळ इंधन भरण्यासाठी वापरावे लागतात. मुळात विभागाकडे चालकांची १५० पदे रिक्त आहेत, त्यात अशा कारणांसाठीही कर्मचारी द्यावे लागतात. दर दिवशी प्रत्येक डेपोतून २५ चालक आणि वाहकांना ओव्हर टाईम ड्युटी करावी लागते. अर्थात ओटी ड्युटीमुळे त्यांचा फायदा होत असला तरी शारीरिक दृष्ट्या त्यांची ओढाताण होते हेही वास्तव आहे. सध्या सिंधुदुर्ग विभागाकडे असलेली चालक, वाहकांची संख्या पाहता या विभागाला आणखी २५ गाड्यांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.

१५ एप्रिलपर्यंत येणार १० मिडी बसेस

सिंधुदुर्ग विभागाकडे सध्या टू बाय टू सिटरच्या बीएस ६-लालपरी बसेस आहेत. या बसेस निश्चितच आरामदायी आहेत. आता या विभागाला येत्या १५ एप्रिल पर्यंत १० मिडी बसेस मिळणार असल्याचे सांगण्यात आले. या मिडी बसेस कमी भारमानाच्या मार्गावर वापरल्या जाणार आहेत. सध्या सिंधुदुर्गचे भारमान ५७.७९ टक्के असून पूर्वीच्या भारमानात किंचित वाढ झाली आहे. आता मुलांच्या परीक्षा संपल्यानंतर भारमान वाढ अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news