

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावाच्या स्वच्छतेकडे नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी मंगळवारी सावंतवाडी नगरपरिषद मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांची भेट घेतली. मोती तलाव येणार्या ड्रेनेज पाण्याचा प्रश्न तत्काळ सोडवण्याची मागणी केली. येत्या आठ दिवसांत हा प्रकार बंद न झाल्यास गप्प बसणार नाही, असा इशारा श्री.परब यांनी दिला.
श्री. परब म्हणाले, शहरातील मोजक्या चार इमारतींमधून ड्रेनेजचे पाणी थेट मोती तलावात सोडले जात आहे. यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन दुर्गंधी पसरत आहे. ‘मोती तलाव’ हे शहराचे सौंदर्य आहे. त्याकडे होणारा दुर्लक्ष आम्ही खपवून घेणार नाही,’ असे परब यांनी मुख्याधिकारी श्रीमती पाटील यांना सांगितले. न. प. आरोग्य विभागाचे या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप श्री.परब यांनी केला. विनोद सावंत, सुधा कवठणकर, महेश पांचाळ, परीक्षित मांजरेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी -भटवाडी परिसरात पाईप लाईनचे काम करताना रस्त्याची खोदाई करण्यात आली. मात्र हे चर व्यवस्थित न बुजविल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून ते अपघाताला निमंत्रण देत असल्याकडे श्री. परब यांनी लक्ष वेधले. यावर मुख्याधिकार्यांनी खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगितले.
मोती तलावात सांडपाणी सोडणार्या संबंधित इमारतींच्या सोसायटींना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. इमारतींमधील रहिवाशांची बैठक घेऊन त्यांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ट्रीटमेंट प्लॅन) सुरू करण्याची सूचना देण्यात येणार आहेत. रहिवाशांनी या सूचनांचे पालन न केल्यास कडक कारवाई करण्यात येईल.
अश्विनी पाटील, मुख्याधिकारी, सावंतवाडी न. प.