

Monsoon Update
कणकवली : दरवर्षी 7 जूनच्या दरम्यान सिंधुदुर्गात दाखल होणारा मान्सून तब्बल 12 दिवस अगोदर रविवार 25 मे रोजी दाखल झाला. गुरुवारी केरळमध्ये दाखल झालेला मान्सून 27 ते 28 मे पर्यंत गोवा व कोकणात दाखल होण्याचा अंदाज होता. मात्र अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणाचा फायदा घेत मान्सून अपेक्षेपेक्षा अगोदर दोन दिवस रविवारी दुपारी गोवा व सिंधुदुर्गात दाखल झाला. गेल्या दहा वर्षांत मान्सूनचे हे कोकणातील जलद आगमन ठरले आहे. नैऋत्य मोसमी वारे रविवार दुपारनंतर सिंधुदुर्गात दाखल झाले असून मान्सूनच्या सक्रिय वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती असून दुपारपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी सोमवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
यंदा मान्सून वातावरणातील पोषक स्थितीमुळे काहीसा लवकरच अंदमान निकोबार बेटासह बंगालच्या उपसागरात दाखल झाला होता. त्याच दरम्यान 13 ते 14 मे पासून सिंधुदुर्गात कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळत होत्या. अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे पट्टे यामुळे मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत आठ ते दहा दिवस अगोदरच मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचला होता. केरळमध्ये दाखल झालेला मान्सून सिंधुदुर्गात येण्यासाठी सुमारे आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. मात्र यावर्षी अनुकूल स्थितीमुळे मान्सून वेगाने म्हणजेच केवळ 48 कोकणात पोहोचला आहे.
मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच अतिशय वेगाने तो रविवारी तळकोकणात पोहोचला आहे. येत्या 72 तासात संपूर्ण राज्यभरात तो सक्रीय होईल अशी शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तो लगेचच महाराष्ट्रात पोहोचल्याने राज्याच्या इतर भागातही तो त्याच वेगाने सक्रीय होईल असे सांगितले जात आहे. सध्या मोसमी वार्यांनी कर्नाटक आणि संपूर्ण गोवा व्यापला आहे. मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीसाठी पोषक स्थिती पाहता उद्या पर्यंत मान्सून मुंबई, ठाण्यासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भापर्यंत धडक देण्याचा अंदाज आहे.
सिंधुदुर्गात मान्सून दाखल झाल्याने रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. अधून-मधून पावसाच्या सरी कोसळल्या तरी जनजीवन सुरळीत होते. दुपारी पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे दिसून आले होते. मात्र सायंकाळी पुन्हा रिपरिप सुरू झाली होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने शहरी भागात फारशी वर्दळ नव्हती. त्यातच पाऊसही संयमाने पडत असल्याने जिल्ह्यात पूर अथवा नुकसान झाल्याची घटना दिसून आली नाही.
कोकणात दरवर्षी 25 ते 30 मे दरम्यान मान्सून पूर्व पाऊस दाखल होतो. या पावसावर दरवर्षी शेतकरी भात पेरणी करतात; मात्र यावर्षी मान्सून पूर्व पाऊस दहा ते बारा दिवस अगोदरच आल्याने शेतकर्यांनी अद्याप पेरण्या केल्या नव्हत्या; मात्र आता मान्सूनच्या आगमनामुळे शेतकरी निर्धास्तपणे पेरणीची कामे वेगाने सुरू करणार आहेत.