

सिंधुदुर्ग : सहा तारखेला तळकोकणात दाखल झालेला मान्सून गेले सहा दिवस पुढे न जाता कोकणातच रेंगाळला आहे. रत्नागिरीतील हर्णे बंदरापर्यंतच त्याची मजल गेली आहे. त्यापुढे सरकायला तो तयार नाही. हवामानशास्त्र विभागाने मान्सूनची ही स्थिती जाहीर केली असली, तरी कोकणात मात्र कडक ऊन पडलेले आहे.
जिल्ह्यात हवेमध्ये थोडासा गारवा आहे. काही ठिकाणी पावसाच्या किरकोळ सरी कोसळतात. परंतु, बहुतांशी आकाश निरभ्र आहे. या दिवसात दरवर्षी धो-धो पाऊस सुरू होतो. नदी-नाले वाहू लागतात, सुकलेल्या विहिरी पाण्याने भरू लागतात. परंतु, हे सुख यावर्षी कोकणवासीयांना मिळालेले नाही.
शुक्रवारी दिवसभर ऊन पडलेले होते. ८ तारखेला मान्सून रत्नागिरीतील हर्णे बंदरापर्यंत पोहोचला होता. मात्र, गेल्या चार दिवसांत तो अजिबात पुढे सरकला नाही. तळकोकणातच तो रेंगाळला आहे. जेव्हा कोकणात शाळा सुरू होतात तेव्हा मुलांना छत्र्या घेऊन शाळेत जावे लागते. विदर्भातल्या शाळा यावर्षी उशिरा भरणार असल्या, तरी कोकणातील शाळा मात्र सोमवार, १५ जूनपासून सुरू होणार आहेत. यावेळी मात्र पाऊस नसल्यामुळे मुलांना कडक उन्हातून शाळेत जावे लागेल, असे चित्र दिसत आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वा.पर्यंतच्या पूर्वीच्या २४ तासांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ १.९३ मि.मी. पावसाची नोंद झाली. देवगड, मालवण, कुडाळ, कणकवली या चार तालुक्यांमध्ये ० पावसाची नोंद आहे. दोडामार्गात १ मि.मी., वैभववाडी ३ मि.मी., वेंगुर्ला ४ मि.मी.; मात्र सावंतवाडीमध्ये ७.५ मि.मी. इतका पाऊस पडला.
भात पेरणी वाया जाण्याची भीती
पुढील काही दिवस मान्सून पूर्ण सक्रिय होईल, असा कोणताही अंदाज अद्याप व्यक्त करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांनी काही ठिकाणी भातपेरणी सुरू केली आहे. परंतु, उन्हामुळे पेरणी वाया जाईल की काय? अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे.