Monsoon Updates : मान्सून महाराष्ट्रात दाखल

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी; देवगडपर्यंत मान्‍सूनची वर्दी
Monsoon Updates
सिंधुदुर्ग : मान्‍सूनचे तळकोकणात आगमन झाल्यानंतर महाराष्ट्र सीमेवरील दोडामार्ग तालुक्‍यात पावसाच्‍या सरी सुरू झाल्‍या. (छाया : ओम देसाई)
Published on
Updated on

सिंधुदुर्ग : अखेर भारतीय हवामानशास्‍त्र विभागाने व्‍यक्‍त केलेल्या अंदाजानुसार शनिवारी मान्‍सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडपर्यंत मान्‍सूनने वर्दी दिली आहे. शुक्रवारी ५ तारखेला सायंकाळपर्यंत उत्तर गोव्यापर्यंत मान्‍सूनने मजल मारली होती. हवामान खात्याने मान्‍सून दाखल झाल्याचे जाहीर केले असले, तरी शनिवारी सायंकाळपर्यंत तरी मान्‍सूनच्या आगमनाच्या मुसळधार सरी सिंधुदुर्गात कोसळल्या नव्‍हत्या; मात्र ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट सुरू झाला होता. पुढच्या दोन-तीन दिवसांत मान्‍सून महाराष्ट्र पादाक्रांत करेल, असा अंदाज हवामानशास्‍त्र विभागाने दिला आहे.

शनिवारी ६ तारखेला मान्‍सूनने अरबी समुद्राचा पश्चिम मध्य व पूर्व मध्य भाग, कर्नाटक, संपूर्ण गोवा आणि दक्षिण कोकणचा काही भाग व्‍यापला आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या दक्षिण भागातही मान्सून दाखल झाल्याचे हवामानशास्‍त्र विभागाने म्हटले आहे. आंध्र प्रदेशचा काही भाग, संपूर्ण तामिळनाडू आणि ईशान्य भारताच्या काही भागांत मान्सून पोहोचला आहे.

गेल्यावर्षी २४ तारखेलाच मान्‍सून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला होता. प्रत्यक्षात १० मे पासूनच पाऊस सुरू होता. तो तब्बल ऑक्टोबर महिन्यापर्यंत पडत होता. त्यामुळे गेल्यावर्षीचा पावसाळा ॠतू हा चार महिन्यांऐवजी सहा महिन्यांचा झाला होता. त्यानंतर मात्र हिवाळ्यातील काही महिने आणि संपूर्ण उन्‍हाळा तसा कोरडाच गेला. अवकाळी पावसानेही फारसा प्रभाव या दोन ॠतूंमध्ये ठेवला नाही.

अल निनोचे संकट येणार असल्याचे गृहित धरून आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि शासनाने सर्व ती पूर्वतयारी केली आहे. केरळममध्ये मान्‍सून २६ तारखेला दाखल होईल, असे सुरुवातीला म्हटले जात होते. प्रत्यक्षात १ जूनचा मुहूर्त पार करून केरळममध्ये मान्‍सून ४ जूनला दाखल झाला. तिथून सिंधुदुर्ग गाठायला मान्‍सूनला साधारणतः पाच सहा दिवस अपेक्षित असतात; परंतु यावेळच्या मान्‍सूनने केवळ ४८ तासांमध्ये सुपरफास्ट प्रवास करून सिंधुदुर्ग गाठले आहे. शनिवारी सायंकाळी आकाशात गडद ढग दाटून आले आणि पावसाने रिमझिम सुरू केली आहे. वातावरणात उकाडा जाऊन गारवा निर्माण झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news