

सावंतवाडी ः गोवा-धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानाचे रुग्णालय आता नव्या तीन ऑपरेशन थिएटर व सीटीस्कॅन सुविधेसह लवकरच रुग्णसेवेस उपलब्ध होेणार आहे. या ठिकाणी पंचकर्मपासून नैसगिक प्रसूती आणि अवघड शस्त्रक्रिया होणार आहे. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना होणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी पत्रकार परिषदेत केले.
याठिकाणी वैद्यकीय उपचार देण्याबरोबर नवोदित विद्यार्थी घडविण्यासाठी स्कील इंडिया या प्रकल्पांतर्गत एक वर्षाचा स्पेशल कोर्स सुरू केला आहे. त्याला देशभरात मान्यता आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या शिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्यावतीने धारगळ-गोवा येथे सन 2017 मध्ये आयुर्वेदिक रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल तीन लाख रुग्णांनी याची सेवा घेतली आहे. यातील चाळीस टक्के रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता हे रुग्णालय अपडेट होत आहे. या पार्श्वभूमीवर तीन आधुनिक ऑपरेशन थिएटर, सीटी स्कॅन यंत्रणा बसविण्यात आली असून पुढील काही दिवसात ती कार्यान्वीत होईल. विशेष म्हणजे पंचकर्म थेरेपी घेण्यासाठी विदेशी पर्यटक आणि स्थानिक लोकांसाठी विशेष रुम उभारण्यात आले आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी सधुदुर्ग आणि गोव्यातील पत्रकारांचा अभ्यास दौरा या रूग्णालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. कल्पना येडवे, डॉ. विनायक चकोर उपस्थित होते.
श्री. जोशी म्हणाले, आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा उद्देश ठेवून रूग्णालयाचे काम सुरू आहे. रुग्णांचा वाढता प्रतिसाद पाहून पंचकर्म व अन्य थेरेपी सोबत अॅलोपॅथी चिकित्सा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने आधुनिक लॅब, एक्स रे मशीन, सीटी स्कॅन यंत्रणा, रुग्णवाहिका, आपत्कालीन यंत्रणा, ब्लड बँक आदीसह पाच आधुनिक ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित होणार आहेत. यात निसर्ग उपचार रूग्णांना मिळणार आहेत.
आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार या हेतु ने रूग्णालयाच्यावतीने गोवा राज्यात व सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोफत आरोग्य शिबिरे घेतली जातात. त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरांमधून रूग्णांची मोफत तपासणी तसेच औषध पुरवठा ही मोफत केला जातो. तर रुग्णालयात येणार्या रुग्णांना केवळ दहा रुपयाचा केसपेपर वर संदर्भ आरोग्य सेवा व औषधे मोफत दिली जातात. तर शस्त्रक्रिया तसेचअन्य उपचारांसाठी शासनाने ठरविलेले दर आकारले जातात. पंचकर्म सुविधा अत्यंत कमी खर्चात दिली जात आहे. विदेशी पर्यटकांना आयुष व्हिसा देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आरोग्य पर्यटनाला त्याचा फायदा होणार आहे असे ते म्हणाले.