

वेंगुर्ले : युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे आज (दि.७) सिंधुदुर्ग जिल्ह्यात मॉकड्रिलची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार वेंगुर्ले नगरपरिषद कार्यक्षेत्रात मॉकड्रिल प्रभावीपणे राबविण्यात आले.
नगरपरिषद कार्यक्षेत्रात सायंकाळी ४.१५ वाजता नगरपरिषदेकडून सायरन वाजविण्यात आल्यानंतर नागरिकांचा त्यास चांगला प्रतिसाद लाभला. यावेळी मुख्याधिकारी हेमंत किरूळकर, पोलिस निरीक्षक संदीप भोसले, प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, नगरपरिषद कर्मचारी, पोलिस, नागरिक, व्यापारी उपस्थित होते.
यावेळी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्यात आले. मॉकड्रिलच्या अनुषंगाने सकाळी तसेच दुपारी २ वाजल्यापासून वेंगुर्ले पोलिस प्रशासनाच्या वतीने नगरपरिषद कार्यक्षेत्रात तसेच वेंगुर्ले बंदर, लाईट हाऊस, दाभोली नाका, रेडी बंदर, सागरेश्वर, शिरोडा वेळागर आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामध्ये २ पोलिस अधिकारी, १५ पोलिस अंमलदार यांचा समावेश होता. दरम्यान रात्री ८ ते ८.१५ या वेळेत वेंगुर्ले सागरी भागात ब्लॅक आऊट सह मॉकड्रिल घेतले जाणार आहे.