

Drug smuggling in Goa
कुडाळ : मनसे कार्यकर्त्यांनी गोवा राज्यात ड्रग्ज आणि गांजा तस्करीच्या वाढत्या घटनांवर चिंता व्यक्त केली आणि या गंभीर समस्येकडे गोवा अँटी नार्कोटिक्स विभागाचे लक्ष वेधले.
सिंधुदुर्ग मनसेने ड्रग्ज व गांजा तस्करीबाबत गोवा अॅन्टी नार्कोटिक्स विभागाचे लक्ष वेधले आहे. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा येथे 25 लाख रुपयांचे ड्रग्ज तस्करी होताना गोवा अॅन्टी नार्कोटिक्स विभागाने कुडाळमधील परवेज नामक एका व्यक्तीला रंगेहात पकडले होते.
या संदर्भात सहा महिन्यांपूर्वी कुडाळ एमआयडीसीमधील एका कंपनीत संशयास्पद व बेकायदेशीर हालचाली होत असल्याबाबतचे पत्र मनसेने कुडाळ पोलिसांना दिले होते. त्यावेळी ड्रग्ज व गांजा तस्करीबाबत तोंडी माहिती दिली होती.
गोवा येथे पकडलेला संशयित परवेज याचा संबंधित कंपनीत कायमचा वावर होता. त्याच्या अटकेनंतर माध्यमासमोर पोलिसांनी आमच्या पत्राची दखल घेतली नाही असे सांगितले होते. तसेच पुढील अधिक माहिती गोवा नार्कोटिक्स विभागाला देण्याचे जाहीर केले होते, त्यानुसार मनसेने गोवा पोलिस मुख्यालयात जाऊन अॅन्टी नार्कोटिक्स विभागाच्या पोलिस निरीक्षकांची भेट घेतली आणि केससंबंधी माहिती दिली.
गोवा नार्को टेस्ट विभागाच्या अधिकार्यांच्या भेटीनंतर सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेत ड्रग्ज व गांजासंबंधी चर्चा करण्यात आली. या जिल्ह्यातून ड्रग्ज, गांजा व अंमली पदार्थ समूळ उच्चाटन होण्यासाठी एकत्र काम करण्याचे ठरले, तसेच अवैध धंद्यांविरोधी माहिती असल्यास पोलिसांना संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी मनसे उप जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, जगन्नाथ गावडे, प्रथमेश धुरी उपस्थित होते.